सातारा : जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊस वाढल्याने खरीप हंगामातील पेरणी तसेच भात लागणीलाही वेग आला आहे. त्यामुळे उशिरा का असेना खरीप हंगामातील पेरणी ५४ टक्क्यांवर पोहोचलीय. अजून काही दिवस पाऊस राहिल्यास पेरणी क्षेत्र वाढू शकते. सध्या दीड लाख हेक्टरवर पेरणी झाली असून यंदा बाजरी क्षेत्र घटणार आहे. तर सोयाबीनचे वाढण्याचा अंदाज आहे.जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यानंतर बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भात ४४ हजार, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, मका १५ हजार, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर तर नागली, तूर, मूग, उडीद, तिळाचे क्षेत्र अत्यल्प आहे. आतापर्यंतचा विचार करता एकूण क्षेत्राच्या १ लाख ५६ हजार हेक्टरवरच पेरणी तसेच भात लागण झालेली आहे. आतापर्यंत भाताची लागण २१ हजार ४६९ हेक्टरवर झालेली आहे. याचे प्रमाण जवळपास ४९ टक्के इतके आहे. त्यानंतर ज्वारीची ७ हजार हेक्टरवर तर मकेची सुमारे पावणे सहा हजार हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे.त्याचबरोबर खरीपातील प्रमुख पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीनची ६२ हजार ५०६ हेक्टरवर पेर झाली आहे. टक्केवारीत याचे प्रमाण ८३.५६ आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी १०० टक्के क्षेत्रावर होऊ शकते असा अंदाज आहे. तर भुईमुगाची २३ हजार ४३१ हेक्टर म्हणजे ७९ टक्के क्षेत्रावर पेर झालेली आहे.जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पेरणीला वेग आला आहे. कारण, चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कल वाढला. तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत खरीप हंगामातील पेरणी कमी झालेली आहे.
साताऱ्यात सर्वाधिक तर खटावमध्ये कमी पेरणी...जुलै महिन्याच्या शेवट आला आहे तरीही १०० टक्के पेरणी झालेली नाही. पश्चिम भागातच पाऊस असल्याने पेरणी तसेच भात लागण १०० टक्के होऊ शकते. मात्र, पूर्वेकडील दुष्काळी भागात हजारो एकर क्षेत्र नापेर राहण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत सर्वाधिक पेरणी ही सातारा तालुक्यात ८२ टक्के एेवढी झालेली आहे. तर सर्वात कमी खटाव तालुक्यात २० टक्क्यांवर झाली. तसेच जावळी तालुक्यात ५५ टक्के, पाटण ८१, कऱ्हाड ७४, कोरेगाव ५५, माण तालुक्यात ३७ टक्के, फलटण तालुका ३०, खंडाळा ४२, वाई ४५ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. अजूनही काही भागात पाऊस नसल्याने पेरणीत खंड पडला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी सुरु आहे. पाऊस असाच सुरू रहिल्यास पेरणी पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढावा. एक रुपया भरुन पिकांचा विमा उतरवता येईल. ३१ जुलै ही पीक विमा भरण्याची शेवटची मुदत आहे. विमा उतरविल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकते. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी