कऱ्हाड : गुहाघर-पंढरपूर राज्यमार्गांतर्गत कऱ्हाड ते ओगलेवाडी दरम्यानच्या रस्त्याच्या कामाला गती आली आहे. गजानन हाउसिंग सोसायटीजवळ रस्त्याची एक बाजू खोदण्याचे काम सुरू असल्याने या बाजूकडील वाहतूक वळविण्यात आली आहे. कऱ्हाडपासून विट्यापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. घाट रस्ता व कऱ्हाडपासून ओगलेवाडीपर्यंत रस्त्याचे काम अद्याप अर्धवट आहे. ठेकेदाराने तीन दिवसांपासून या रस्त्याचे काम हाती घेतले असून, एक बाजू खोदण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू असून, वाढलेल्या रहदारीमुळे वाहतूककोंडी होत आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त शिबिर होणार ऑनलाइन
कऱ्हाड : गुरुपौर्णिमेनिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने ऑनलाइन राजयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २६ जुलैदरम्यान सायंकाळी सात ते आठ या वेळेत हे शिबिर होणार असल्याची माहिती प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या नागठाणे केंद्राच्या संचालिका सुवर्णादिदी व अहमदनगर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी राजेश्वरीदिदी यांनी दिली. शिबिराचे संयोजक ब्रह्मकुमार दीपक हरके असून, या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कऱ्हाड पालिकेकडून बर्गे मळा रस्त्यावर मुरुम
कऱ्हाड : येथील वॉर्ड क्रमांक १३ मधील शिक्षक कॉलनी ते बर्गे मळा रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या रस्त्यावर नागरिकांना कसरत करावी लागत होती. मुरुम टाकल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होत असते. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त व्हावा, यासाठी आठ महिन्यांपूर्वी भीम आर्मीचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी आंदोलन केले होते. आंदोलनाची दखल घेऊन पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर मुरुम टाकला आहे. हा रस्ता लवकरच कायमस्वरूपी दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.