सातारा : जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांमधून वार्षिक आराखड्यानुसार निधीचे वाटप होत असले तरी मायणी गटात दरवर्षी निकष डावलून व अतिरिक्त निधी दिला जात आहे. तसेच एकाच कामावर दोन-तीन वेळा निधी वितरीत झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे २०१५ पासून आतापर्यंत झालेल्या निधीवाटपाची चौकशी करावी, अशी मागणीच ब्रम्हदेव हिंदुराव काटकर यांनी अध्यक्षांकडे केली आहे. यामुळे जोरदार खळबळ उडाली आहे.
याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माण तालुक्यातील वडजल येथील ब्रम्हदेव हिंदुराव काटकर यांनी निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जिल्हा परिषदेत विविध विभागांच्या वार्षिक आराखड्यातील निधीचे वाटप नियमानुसार करण्यात येते. पण, दरवर्षी मायणी जिल्हा परिषद गटातील कामांना निकष डावलून निधी देण्यात येतो. त्यामुळे जिल्ह्यातील इतर गटांना निधीचे वाटप कमी प्रमाणात होत आहे. तर वडजल येथील विकासकामांबाबत जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागात संपर्क साधला असता गावातील कामे आराखड्यात समाविष्ट नाहीत असे सांगून निधी मिळणार नाही, असे सांगण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे मायणी जिल्हा परिषद गटात कोट्यवधींचा निधी एकाच कामावर दोन-तीन वेळा खर्च होत आहे. यामुळे निधीची आवश्यकता असणाऱ्या गावांना वंचित राहावे लागत आहे.
मायणी गटात झालेल्या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच निधीचे समन्यायी वाटप करण्यात यावे. मायणी गटात एकाच कामावर दोन-तीनवेळ निधी वितरीत करुन भ्रष्टाचार झाला असल्यास दिलेल्या निधीची चौकशी करावी. तसेच याबाबत संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही ब्रम्हदेव काटकर यांनी केली आहे. दरम्यान, या निवेदनावर पदाधिकारी व प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.