दत्ता यादव - सातारा -विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शहरामध्ये मताधिक्य कमी पडले होते. काही स्थानिक नगरसेवकांनी काम केले नसल्यामुळे ही परिस्थिती ओढावली होती. हे जाणून असलेल्या शिवेंद्रसिंहराजेंनी आता यातून पुन्हा उभारी घेण्यासाठी व बिनकामी नगरसेवकांना शह देण्यासाठी नगरसेवकांच्याच वॉर्डमध्ये स्वयंसेवक कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर नसेल ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये १ लाख २७ हजार १४३ मते पडली होती. त्यामध्ये सातारा शहराचा वाटाही चांगला होता. परंतु २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना एकूण ९७ हजार ९६४ मते पडली. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असताना या निवडणुकीमध्ये अचानक मताधिक्क्य घटल्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंना मानणारा वर्ग कमी झाला की काय, अशीही चर्चा सुरू झाली. काही नगरसेवक आपली ठेकेदारी बळकट करण्याच्या प्रयत्नात कामाकडे दुर्लक्ष आणि नेत्यांजवळ पुढे-पुढे करतात. त्यामुळे साहजीकच नेत्यांकडे सर्वसामान्यांचा थेट संपर्क तुटला. त्यातूनही एखादा नागरिक थेट नेत्यांना भेटलाच तर संबंधित वॉर्डमधील नगरसेवकाच्या भुवया उंचवतात. अशा भेटींचा प्रतिष्ठेचा मुद्दा करून नगरसेवकांकडून सर्वसामान्यांची नेहमीच बोळवण केली जाते. त्यामुळे नाराज असलेले नागरिक मग मतपेटीद्वारे आपल्या भावना व्यक्त करतात. हीच परिस्थिती सध्या सातारा शहरामध्ये असल्यामुळे नगरसेवकांना चेकमेट देण्यासाठीच ही व्यूहरचना असल्याचे बोलले जात आहे.
नगरसेवकांना बाजूला सारून स्वतंत्र फळी !
By admin | Published: May 26, 2015 10:28 PM