सातारा : एनआरसी व सीएए कायदा संविधान विरोधी असल्याचा आरोप करत या कायद्याला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी बंद पुकारण्यात आला. या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सातारा शहरातील बाजारपेठ शुक्रवारी सकाळपासून बंद ठेवण्यात आली. रिक्षा व्यावसायिकांनीही बंदमध्ये सहभाग घेतल्याने शहरातील प्राथमिक शाळांना दुपारनंतर सुटी देण्यात आली.काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी सातारा शहर बंदचे आवाहन केले होते. तेव्हाही सातारा शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. आठवडाभरानंतर झालेल्या दुसऱ्या आंदोलनालाही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
शहरात सकाळपासूनच कडकडीत बंदचे वातावरण होते. रिक्षा बंद ठेवण्यात आल्या. मुख्य बाजारपेठेतील दुकानेही बंद ठेवण्यात आलेली होती. शहरातील शाळांमध्ये सकाळीच विद्यार्थी दाखल झाले; परंतु रिक्षा न भेटल्याने अनेक विद्यार्थी शाळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे शाळा व्यवस्थापनांनी शाळेला सुटी देऊन टाकली.दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत व त्यांचे सहकारी सकाळी शाहू चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी एकत्र आले. या ठिकाणी पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी चंद्रकांत खंडाईत म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे ४0 टक्के हिंदू समाजालाही त्याचा फटका बसणार आहे. केंद्र सरकारने देशाला आर्थिक मंदीच्या खाईत लोटले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. पराकोटीची बेरोजगारी वाढली आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे.
कायदा व सुव्यवस्था पूर्णत: मोडकळीस आलेली आहे. देशातील फायद्यात चालणारे सरकारी प्रकल्प कवडीमोल दराने विकले जात आहेत, या विरोधात आवाज उठविण्यासाठी सातारा बंदची हाक देण्यात आलेली आहे. संविधानप्रेमी संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होऊन संविधान बचाव देश बचाव आंदोलनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.