नागठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे नागठाणे परिसरात या लाॅकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
सातारा तालुक्यातील नागठाणे हे बाजारपेठेचे मोठे गाव आहे. अनेक गावातून दररोज बरेच चाकरमानी ये जा करत असतात. नागठाणे परिसरात शासन नियमानुसार अत्यावश्यक सेवा व्यवस्थितरित्या सुरू होत्या. नागठाणेच्या सरपंच डॉ. रुपाली बेंद्रे व उपसरपंच अनिल साळुंखे यांनी केलेल्या आवाहनास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. तर गावामध्ये बोरगाव पोलीस ठाण्याच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पंचक्रोशीतील नागरिकांची अत्यावश्यक कामकाजाशिवाय नागठाणे गावात ये जा दिसून आली नाही. त्याचबरोबर गावातील नागरिकही घराबाहेर पडले नाहीत. तर नागठाणे-सासपडे रस्त्यावर पूर्णपणे शुकशुकाट दिसून आला.
दरम्यान, नागठाणे परिसरातील काशीळ, निसराळे, अतित, माजगाव, निनाम, पाडळी, सोनापूर, मांडवे, बोरगाव, भरतगाव, भरतगाववाडी तसेच वळसे आदी गावांमध्ये लाॅकडाऊनला प्रतिसाद मिळाला. गावातील मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, किराणा, जनरल स्टोअर्स, मंगल कार्यालये, सलून दुकाने पूर्णपणे बंद ठेवून ग्रामपंचायत प्रशासनास ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते.