सातारा : जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न करताच ऊसतोड व वाहतूक सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी रात्री फलटण तालुक्यातील मिरगाव येथे शरयू शुगरकडे जाणाºया ८ ट्रॅक्टर-ट्रॉलींच्या चाकांतील हवा सोडून देण्यात आली.जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदराची घोषणा न करता ऊसतोड सुरू केली आहे. ही तोड त्वरित थांबविण्याचे आदेश प्रशासनाने काढावेत, अन्यथा होणाºया आंदोलनास साखर कारखानदार जबाबदार राहतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाºयांना मंगळवारी निवेदनाद्वारे दिला होता.जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत यावर्षीच्या गाळप होणाºया उसाची पहिली उचल ३४०० रुपये प्रतिटन घेण्याचा ठराव करण्यात आला आहे. सध्या मात्र जिल्ह्यातील बहुतांशसाखर कारखान्यांचा गळित हंगाम उसाची मोळी टाकून सुरू झालेला आहे. हे साखर कारखाने ऊसतोडीसाठी सज्ज झालेले आहेत. ऊसतोडी कामगारांच्या टोळ्या गावोगावी दाखल होत आहेत. या ऊसतोडी टोळ्यांकडून तोडणी सुरू झालेली आहे.जिल्ह्यातील एकाही कारखान्याने दर जाहीर केलेला नाही. प्रशासनानेही याबाबत गंभीर भूमिका घेतली नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व संघटनेचे कार्यकर्ते यांनी आक्रमक भूमिका घेत हे आंदोलन केले. ऊस वाहतूक करणाºया ८ वाहनांतील हवा सोडली तसेच काही वाहनांचे टायर पंक्चरही करण्यात आले. या आंदोलनाच्या निमित्ताने ऊसदराच्या आंदोलनाची पहिली ठिणगी पडल्याचे स्पष्ट होत आहे.
ऊस दर आंदोलनाची फलटणमध्ये ठिणगी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:36 AM