मलकापूर : वाढत्या कोरोना संक्रमणामुळे मलकापुरात कडक लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली आहे. मात्र दूध व अत्यावश्यक सेवा बंद केल्याने गैरसोय होऊ नये म्हणून येथील पालिकेने घरपोच सेवेसाठी टास्कफोर्स तयार केली आहे. शहरात ७३ दुकानदारांना अधिकृत परवाने दिले आहेत. तर पालिकेने भाजीपाल्यांच्या घरपोहोच सुविधेसाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने प्रभागनिहाय पथके तयार केली आहेत.
मलकापूर शहरात मंगळवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कडक निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली आहे. यात रुग्णालय व मेडिकल वगळता इतर जीवनावश्यक सेवा बंद ठेवल्या आहेत. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र शहरातील नागरिकांच्या गैरसोयीची दखल घेऊन पालिकेने आपत्ती व्यवस्थापनाची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत मंगळवारपासूनच घरपोच सेवेसाठी शहरातील ७३ दुकानदारांची निवड केली. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सल्ल्यातून गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही पालिकेने केवळ १०० रुपयात भाजीपाला किट तयार केले आहे. ते पालिकेमार्फत घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस प्रशासकीय अधिकारी, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, सर्व नगरसेवकांसह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या सहा दिवसात किराणा माल दुकाने, भाजीपाला विक्री केंद्र, दूधविक्री, मटण/ चिकन व अंडीविक्री करणाऱ्या ७३ दुकानदारांना घरपोच सेवेसाठी अधिकृत परवाने दिले आहेत. या दुकानदारांनी सकाळी ७ ते ११ या वेळेत ही सेवा द्यायची आहे. तशी त्यांची यादी सोशल मीडियासह सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध केली आहे, तसेच घरपोच भाजीपाला देण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. या घरपोच सेवेची एक टास्क फोर्स तयार केली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांसह शहरातील सर्व प्रभागातील सेवाभावी संस्थांमधील कार्यकर्त्यांचा समावेश केला आहे. पालिकेच्या कार्यालयासह प्रभाग नोडल अधिकाऱ्यांकडे किट मागणीची सकाळी ९ ते २ या वेळेत नोंद केल्यास भाजीपाला किट घरपोच केले जाणार आहे.
चौकट
अधिकृत दुकाने - ७३
किराणा माल ४४
मटण व चिकन १७
भाजीविक्री ४
दूधविक्री ७
अंडीविक्री १
कोट
भाजीपाला किट मागणीसाठी लक्ष्मीनगर बहुउद्देशीय इमारत व आगाशिवनगर जलशुद्धीकरण केंद्र या दोन ठिकाणी संपर्क यंत्रणा ठेवली आहे. पालिकेच्या दूरध्वनीवर संपर्क करून या सुविधेचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच घरातच थांबून कोरोनाला थांबवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
मनोहर शिंदे, उपनगराध्यक्ष मलकापूर