सातारा : जिल्हाभर गेल्या महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह जोरात साजरा केला गेला. परंतु शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोळाच्या ओढाजवळील सातारा-पुणे व सातारा-महाबळेश्वर या दोन मार्गांना जोडणाऱ्या चौकात कोणत्याही उपाययोजना नसल्याने तो अपघातांना निमंत्रण देत आहे. अनेकांच्या आयुष्याचा छेद घेतलेला हा चौक ओलांडताना वाहनचालकांचा थरकाप उडवत आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा पोलिस, राज्य परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताह दरवर्षी थाटात साजरा केला जातो. यानिमित्ताने शहरातून अनेक उपक्रम राबवून जनजागृती केली गेली. हे सर्व कौतुकास्पद आहेच; परंतु अनेक वर्षांपासून धोकादायक ठरलेल्या बाबींकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे समोर येत आहेत. सातारा-पुणे मार्गावरील मोळाचा ओढा येथे असलेला चौक हा त्यापैकीच एक आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण झाले आहे. त्यामुळे पुण्याकडून साताऱ्यात येणारी वाहने सरासरी ऐंशी किलोमीटर प्रतितास पेक्षा जास्त वेगाने येतात. आनेवाडी टोलनाक्याचा अपवाद वगळण्यानंतर साताऱ्यापर्यंत वाहनांना कसलाही अडथळा नाही. त्यामुळे साताऱ्यात प्रवेश केला तरी वाहने आहे त्याच वेगात येतात. लिंबखिंडपासून साताऱ्यात येणारा रस्ता मोळाचा ओढापर्यंत अरुंद आहे. बरेचशे अंतर जास्त वेगात वाहन चालविल्यामुळे वाहनांचा वेग कमी करण्याची वाहनचालकांची मानसिकता होत नाही. त्यामुळे अरुंद मार्गावरून समोरून आलेल्या वाहनांना कट मारत शहरात येतात. काही अंतरावर मोळाचा ओढा लागतो. त्याठिकाणी अचानक छेद रस्ता लागतो. महाबळेश्वरकडून येणारी वाहनेही या चौकात येताना वेग कमी करत नाहीत. साताऱ्याकडून पुण्याकडे निघालेली वाहने चौक ओलांडून पुण्याकडे जातात. त्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत. (प्रतिनिधी) रस्त्याकडेलाच भाजीमंडई सातारा-पुणे, सातारा-महाबळेश्वरला जाणारा रस्ता जेथे जोडला जातो. तेथेच रस्त्याच्या कडेलाच सायंकाळच्या वेळेस शेतकरी भाजी विकण्यासाठी बसतात. या परिसरातील ग्रामस्थांसाठी यामुळे सोय होत असली तरी रहदारीसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे भाजीविक्रेत्यांना पर्यायी जागा देऊन भविष्यातील संकट टाळण्याची गरज आहे. वाहतूक पोलिस अन् सिग्नलचा अभाव या चौकात वाहनांचा ताण असतो. त्यामुळे येथे चोवीस तास धोका दाखविणारे स्वयंचलित सिग्नल बसविण्याची गरज आहे. तसेच वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्याची मागणी अनेक वर्षांपासून जोर धरत आहे. सायंकाळी दुचाकींची वर्दळ सातारा शहराचा विस्तार होत आहे. त्यामुळे बहुसंख्य लोक कण्हेर, साबळेवाडी, नुने, सारखळ, कोंडवे तसेच सैदापूर, वर्ये, नेले, किडगाव, धावडशी आदी गावांमधील तरुण-तरुणी महाविद्यालय तसेच नोकरीनिमित्ताने दुचाकीवरून साताऱ्यात येतात. सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत दुचाकींची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या काळात पोलिस देण्याची गरज आहे. )
मोळाच्या ओढ्याजवळ मृत्यूचा चौक...
By admin | Published: February 06, 2017 12:55 AM