जगदीश कोष्टी।‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रिदवाक्य उराशी बाळगून अहोरात्र धावणारी एसटी कोरोनामुळे अडीच महिन्यांपासून जागेवर आहे. यामुळे एसटीची आर्थिक समीकरणं बदलली. लॉकडाऊनमधून जिल्ह्याअंतर्गत प्रवासी वाहतुकीला सूट मिळाली असली तरी प्रवासीच फिरकत नाहीत. प्रवासी वाहतुकीतून मिळणारे पैसे हे प्रमुख उत्पान्नाचे स्त्रोत बंद पडल्याने एसटीने आता माल वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा विभागात त्याला सुरुवातही झाली आहे. या पार्श्वभूमीवर एसटीच्या साताऱ्याचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : एसटीला माल वाहतुकीचा पर्याय का निवडावा लागला?उत्तर : कोरोनामुळे एसटीची वाहतूक बंद आहे. तसेच संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवण्याच्या निमित्ताने एसटीत पन्नास टक्के म्हणजे केवळ २२ प्रवासी घेऊन जाता येतात. प्रवासी वाहतुकीतून मिळणारे पैसे हा एसटीचे आजवर प्रमुख उत्पन्न होते. हेच उत्पन्नच पन्नास टक्क्यावर येणार आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवीन पर्याय शोधणे गरजेचे होते.
प्रश्न : याची तयारी कुठवर आली आहे?उत्तर : एसटीच्या मुंबईतील रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाने ट्रकचे डिझाईन तयार केले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक विभाग किमान दोन ट्रक तयार करणार आहेत. सातारा विभागात ही प्रक्रिया सुरूही झाली आहे.प्रश्न : यासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागली का?उत्तर : शासनानेच एसटीला प्रवासी अन् माल वाहतुकीबाबत परवाना दिला आहे. त्यानुसार सुरुवातीस महाराष्ट्रात मालवाहतूक केली जाणार आहे.
नवीन ट्रकसाठी अंतर्गत रचनेत बदलपावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे काही बदल केले आहेत. पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून खिडक्यांना अॅल्युमिनिअमचा पत्रा मारला जाणार आहे. तसेच काही वेळेस खालून पाणी येण्याचा धोका असतो. माल भिजू नये, यासाठी खालीही पत्र्याची प्लेट टाकली जाणार आहे. वजनदार वस्तू वाहतूक होणार असल्याने पाट्यांमधील ताणही वाढवला जाणार आहे.
खासगी लोकांकडून व्यवसायाची सूत्रकेवळ माल वाहतूक करणे हा एसटीने कधी व्यवसाय केलेलाच नाही. नव्या व्यवसायातही यशस्वी होण्यासाठी त्या व्यवसायातील बारकावे, माल भरणे, उतरवणे, कोठे सोडणे याबाबतची बारकावे एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचारी खासगी माल वाहतूकदारांकडून घेत आहेत. यासाठी खासगी व्यावसायिकही मोठ्या मनाने माहिती देत आहेत.
एसटीतून आठ ते नऊ टन मालवाहतूक करता येणार आहे. आंब्यांच्या पेट्यांपासून कंपनीतील सुट्या भागांची वाहतूक केली जाणार आहे. सातारा विभागाने साताऱ्यातून पुण्याला पेव्हर ब्लॉकची वाहतूक करून नव्या व्यवसायाचा श्री गणेशाही केला आहे.- सागर पळसुले, विभाग नियंत्रक, सातारा