शिरवळ : शिरवळ येथे एसटी चालकाला बेदम मारहाण करीत मोबाईलचे नुकसान करण्यात आले. यामुळे सरकारी कामात अडथळा व मारहाणप्रकरणी कारचालकासह दोघांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई आगाराची एसटी (एमएच ११ टी ९२७७) ही बस चालक बाबालाल शहाबुद्दीन शेख (वय ४०, रा. सोळशी ता. कोरेगाव) हे स्वारगेटहून सातारा याठिकाणी घेऊन निघाले होते. यावेळी सोबत वाहक जयश्री रामचंद्र महामुनी ह्या सोबत होत्या.
संबंधित बस शिरवळ हद्दीत आली असता पाठीमागून आलेल्या कार (एमएच ११ सीक्यू ०६२१) ने एसटीला ओव्हरटेक करीत एस.टी. बससमोर येऊन अचानक थांबली. यावेळी बससमोर अचानकपणे बससमोर कार थांबल्याने चालक बाबालाल शेख यांनी बस थांबवण्याचा प्रयत्न केला असता बस कारला जाऊन चिकटली.यावेळी कारमधील कारचालक व आणखी एक जण कारमधून उतरत बसचालक बाबालाल शेख यांना बसमधून खाली उतरवत कारचालकाने बाबालाल शेख यांच्या तोंडावर डोक्याने मारहाण केली. शेख यांना रस्त्यावर आडवे पाडत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी मारहाण केल्याने बाबालाल शेख यांचे दात पडले. यावेळी कारचालकासह दोघेजण कार घेऊन सातारा बाजूकडे निघून गेले.दरम्यान, एसटी बसचालक बाबालाल शेख यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून कारमधील कारचालकासह दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे तपास करीत आहे.