सातारा : धावत्या एसटीत चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने नियंत्रण सुटल्यानंतर एसटीने दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गर्भवती महिलेचा अखेर तीन दिवसांनंतर गुरुवारी सकाळी साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.कल्याणी वैभव देशमुख (वय २५, रा. नांदगाव, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या दुर्देवी महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी दि. ४ रोजी सकाळी कल्याणी देशमुख या पती वैभव देशमुख यांच्यासमवेत सोनोग्राफी करण्यासाठी साताऱ्यात येत होत्या.
याचवेळी खिंडवाडीजवळ मुंबईहून कऱ्हाडकडे निघालेल्या एसटीतील चालकाला अचानक हृदय्विकाराचा झटका आला. त्यामुळे एसटी विरूद्ध लेनवर जाऊन समोरून आलेल्या देशमुख दाम्पत्याच्या दुचाकीला धडक देऊन एसटी झाडीत अडकली.
चालकाला तत्काळ खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर देशमुख दाम्पत्यालाही साताऱ्यातील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. दोन दिवसांनंतर चालकाची प्रकृती सुधारली. मात्र, कल्याणी देशमुख या अपघात झाल्यापासून बेशुद्धअवस्थेतच होत्या.
गुरुवारी सकाळी उपचार सुरू असताना अचानक त्यांचा मृत्यू झाला. त्या पाच महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. एसटी महामंडळाकडून मदत न मिळाल्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते चिन्मय कुलकर्णी यांनी परिवहन मंत्र्यांशी थेट संपर्क साधला. साताऱ्यातील एसटी अपघाताची माहिती देऊन त्यांनी देशमुख कुटुंबीयांना मदत देण्याची विनंती केली. मात्र, जो पर्यंत सरकार स्थापन होणार नाही तोपर्यंत आपण काही करु शकत नाही, असे त्यांनी सांगितले असल्याची माहिती कुलकर्णी यांनी प्रासारमाध्यमांशी बोलताना दिली.
एसटीची दुचाकीला धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. यातील जखमी अन् मृताला राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार पीफॉर्म भरून देण्यात आला आहे.सागर पळसुले,विभाग नियंत्रक सातारा