जयवंत बाबासाहेब नलवडे (वय ५०, रा. सोनकिर, ता. कडेगाव, जि. सांगली) असे अपघातात मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनकिर येथील जयवंत नलवडे हे शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पत्नीसह दुचाकीवरून कऱ्हाडला आले होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते कोल्हापूर नाका परिसरात असताना बागवान ट्रान्सपोर्टसमोर पाठीमागून आलेल्या एसटीने नलवडे यांच्या दुचाकीला धडक दिली.
या धडकेत जयवंत नलवडे व त्यांची पत्नी दुचाकीवरून खाली कोसळले. त्यामध्ये जयवंत नलवडे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलिसात झाली आहे.
- चौकट
पदोन्नतीपूर्वी काळाचा घाला
दरम्यान, अपघातात मृत्यू झालेले जयवंत नलवडे यांना गुरुवारी पदोन्नती मिळणार होती. सध्या ते सुभेदार मेजर या पदावर कार्यरत होते. गुरुवारी त्यांना मेजर पदी पदोन्नती मिळणार होती. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबीय आनंदात होते. मात्र, पदोन्नती मिळण्यापूर्वी चार दिवस अगोदर काळाने त्यांच्यावर घाला घातला.