सातारा : कोरोनाने सर्वत्रच हाहाकार माजविला असून, वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठमोठी माणसं बळी पडत आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारीही यातून सुटलेले नाहीत. सातारा विभागातील तब्बल २८६ कर्मचाऱ्यांना या काळात कोरोनाचा संसर्ग झाला होता, तर बारा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन अधिकाऱ्यांसह दहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आल्याने दसऱ्यापर्यंत एसटीच्या फेऱ्या पूर्णपणे ठप्प होत्या. त्यातूनही परप्रांतीयांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडून येण्याचे काम एसटीने पार पाडले होते. मात्र या सहा ते सात महिन्यांच्या कालावधीत एसटीला कधी नव्हे ते नुकसान झाले. कर्मचाऱ्यांना पगार देण्याएवढेही उत्पन्न नसल्याने अनेकदा सरकारकडून मदत घ्यावी लागली होती.
एसटी वाहतुकीला शासनाने परवानगी दिल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याने एसटीला पुन्हा पूर्वीचे दिवस मिळवून देण्यासाठी जिवाचे रान केले. सहा-सात महिने कोठेही जाता आले नाही. त्यातच कोरोनाची लाट कमी झाली होती. त्यामुळे गावी जाण्यासाठी नागरिक एसटीकडे वळू लागले होते. त्यामुळे संसर्गाचा धोका असतानाही कर्मचारी कामावर रुजू झाले. मागील नुकसान सोडाच, पण किमान यापुढे तरी कर्मचाऱ्यांचा पगार निघाला पाहिजे यासाठी जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.
नुकसान भरून काढण्यासाठी राज्यातील सर्वच विभाग, आगारांनी लांब पल्ल्याच्या मोठ्या शहरांमध्ये गाड्या सोडल्या. त्यामुळे चालक-वाहकांना दोनशे-तीनशे किलोमीटरपर्यंत जावे लागत होते. यामुळे एका फेरीत कित्येक ठिकाणी प्रवासी उतरत व नवे बसत असत. यामुळे बहुधा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास निमंत्रण मिळाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांचा मुंबईतील बेस्टसाठी वापर करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईला विविध विभागातून कर्मचारी पाठविण्याचे फर्मान मध्यवर्ती कार्यालयाकडून सोडण्यात आले. त्याला कर्मचाऱ्यांचा प्रखर विरोध असतानाही विभागीय कार्यालयाकडून आदेश असल्याने स्थानिक अधिकारीही काही करू शकत नव्हते.
फलटण आगारावर दु:खाचा डोंगर
सातारा विभागातील तब्बल २८६ कर्मचारी, अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर कौटुंबिक भावनेतील एसटीचे अधिकारी, कर्मचारी दवाखान्यात जाऊन प्रशासनाची भेट घेतात. चांगले उपचार करण्याबाबत विनंती करतात. पण त्यातूनही काही सहकारी सोडून गेले. यामध्ये फलटण आणि खंडाळा आगारातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. फलटण आगारातील दोन वरिष्ठांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. ही घटना कर्मचाऱ्यांच्या मनाला चटका लावून गेली.
चौकट
कोरोनायोद्ध्यात समावेश नाही
अत्यावश्यक सेवा म्हणून एसटीकडे पाहिले जाते. निमशासकीय असले तरी एसटी कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकारच्या कोरोनायोद्धा या यादीत समावेश नाही. त्यामुळे मदत मिळणेही अवघडच आहे.
कोट :
बेस्ट सेवेसाठी कर्मचारी पाठविण्याचा निर्णय मध्यवर्ती कार्यालयाचा आहे. तो आम्हाला ऐकावाच लागत असला तरीही मी स्वत: याबाबत वरिष्ठांकडे कर्मचाऱ्यांच्या भावना कळविल्या आहेत.
- सागर पळसले,
विभाग नियंत्रक, सातारा