सातारा : एसटीतून प्रवास करताना कधी प्रवाशांनाच टोल भरायला लागला आहे, असं आपण कधी ऐकल आणि पाहिलंही नव्हतं. मात्र, आनेवाडी टोलनाक्यावर रविवारी रात्री हे प्रवाशांना अनुभवयास मिळालं. चक्क एसटीतील प्रवाशांनाच टोल भरावा लागल्याचे वास्तव समोर आले आहे.
रविवारी सुटीचा दिवस असल्याने पुणे स्वारगेट बसस्थानकामध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहून प्रवाशी थकले होते. त्यानंतर एसटी (एमएच ११ बीएल ९३०४) फलाटला लागल्यानंतर प्रवासी बसमध्ये एकदाचे बसले. स्वारगेट सातारा ही विनाथांबा बस रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास पुण्याहून साताऱ्याकडे रवाना झाली. खंबाटकी घाट उतरल्यानंतर चालकाने बस थांबवून काहीवेळ अंधाराचा आडोसा घेतला. त्यानंतर बस पुन्हा साता-याच्या दिशेने धाऊ लागली. आनेवाडी टोलनाक्यावर बस पोहोचल्यानंतर फास्ट टॅग स्कॅनरमधून पुढे जात असताना स्कॅनर बंद पडल्याचे टोल व्यवस्थापनाने सांगितले. माझ्याजवळ पैसे नाहीत, असे बस चालकाने त्यांना सांगितले. परंतु टोल रोखीने भरल्याशिवाय बस पुढे जाऊ देणार नाही, अशी टोल प्रशासनाने भूमिका घेतली.
टोलचे पैसे कोण भरणार, असा प्रश्न निर्माण झाला. स्कॅनर बंद पडणे हा तुमचा दोष असून, आम्हाला वेठीस कशासाठी धरता, असे बसमधील प्रवाशांचे म्हणणे होते. परंतु टोल भरल्याशिवाय बस काही पुढे सोडली जात नव्हती. अखेर बसमधीलच प्रवासी महेंद्र भोकरे व त्यांच्यासह अन्य एकाने पुढे होऊन स्वत:च्या खिशातील २२० रुपये दिले. त्याचवेळी टोल प्रशासनाने बस सोडली. टोलनाक्यावर सुमारे पाऊणतास ताटकळत थांबून एसटी बस अखेर साता-याकडे रवाना झाली.
- साता-यात रात्री सव्वा अकराला एसटी पोहोचली. रात्री अकरानंतर रिक्षा चालकांकडून जादा पैसे आकरले जातात. याचा फटका या एसटीतील प्रवाशांना बसला. जिथ दहा रुपयांत घरी जाता येत तिथे अनेकांना रिक्षासाठी अनेकांना ८० रुपये द्यावे लागले. यामुळे आणखीनच मन:स्ताप सहन करावा लागला.
- विनाथांबा गाडीचा विनाकारण त्रास..
पुण्यात राहात असलेल्या आपल्या मुलांना भेटून काही वयोवृद्ध दाम्पत्य साता-यात येत होते. अशा दाम्पत्यांना विनाथांबा गाडीचा विनाकारण त्रास सहन करावा लागला. एक वयस्क दाम्पत्य तर आजारी होते. त्यांना एसटीमध्ये धड निट बसताही येत नव्हतं. त्यातच त्यांना भूकही लागली होती. त्यांची अशी झालेली अवस्था पाहून प्रवासी हळहळले.