सातारा : पुण्याला किंवा मुंबईला कार्यालयीन वेळेत पोहोचायचे असते. गाडीत बसल्यानंतर किती वेळेत पोहोचणार याचा विचार सुरू होतो. पण टोलनाक्यावर एसटीला ब्रेक लागतो. काही वेळेस पंधरा ते वीस मिनिटंही सहज जातात. अन् चिडचिड सुरू होते. याला आता खो बसला असून, एसटीच्या नवीन ‘ई-टॅग’ प्रणालीमुळे टोलनाक्याच्या कोणत्याही अडथळ्याविना एसटी धावू शकणार आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो गाड्या दररोज रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे एसटीसाठी टोल फ्री करावा, अशी मागणी जोर धरली जात होती. याला अद्याप यश आले नसले तरी एसटीला मासिक पास दिला जात होता. यामुळे दररोज पैसे द्यावे लागत नसले तरी वेळ हा जात होताच. हाच वेळ वाचविण्यासाठी एसटीने ई-टॅग ही आधुनिक प्रणाली अस्तित्वात आणली आहे.ई-टॅग ही प्रणाली राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या गाड्यांसाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये एसटीच्या दर्शनी भागातील काचेवर विशिष्ट प्रकारचे स्टिकर चिटकवलेले असेल. स्टिकर असलेली एसटी राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावरून गेल्यास आहे त्याच वेगात स्टिकर स्कॅन केले जाईल. त्यानंतर त्याची नोंद तेथील संगणकावर केली जाणार आहे. यासाठी बँकेमध्ये आगारनिहाय खाते उघडलेले असेल. या खात्यामध्ये दरमहिन्याला ठराविक रक्कम भरणा करायची आहे. एसटीचे स्टिकर स्कॅन झाल्यावर गाडीच्या नंबरची नोंद होणार आहे. त्यामुळे त्याच क्षणी बँकेच्या खात्यातून ठरलेली रक्कम कापून घेतली जाणार आहे. याचा संदेश तत्काळ विभाग नियंत्रक, लेखाधिकारी व आगार व्यवस्थापकांना जाणार आहे.टोलमध्ये दहा टक्के सवलत ई-टॅग प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर पथकराच्या रकमेत दहा टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच परजिल्ह्यातून आलेले वाहन तांत्रिक कारणाने बंद पडल्यास त्या गाड्यांला ई-टॅगचीच दुसरी पर्यायी गाडी देण्याचे अधिकार संबंधित आगार व्यवस्थापकांना दिले आहेत, अशी माहिती लेखाधिकारी दीपाली कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
एसटी धावणार टोलनाक्यांच्या अडथळ्याविना !
By admin | Published: February 04, 2017 12:07 AM