सातारा : एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेले आठ दिवस शांततेत सुरू असतानाच, मंगळवारी या संपाला गालबोट लागले. दोन दिवसांपासून खासगी शिवशाही बस प्रवासी घेऊन जात आहे. शिवशाही घेऊन गेलेल्या वाहकाला इतर कर्मचाऱ्यांनी जाब विचारताच, त्याने डोक्यात दगड घातला. यामध्ये वाहतूक नियंत्रक गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे बस स्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अमित चिकणे असे जखमी वाहतूक नियंत्रकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीन करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप सुरू केला आहे. गेले आठ दिवस संप शांततेच्या मार्गाने सुरू होता. कर्मचारी काही ठिकाणी सहकुटुंब मोर्चा काढून, काही ठिकाणी मुंडन करून शासनाचा निषेध करत होते. त्यामुळे एकही गाडी आगारातून बाहेर जाऊ शकली नव्हती.
दरम्यान, न्यायालयाने कोण कामावर जाणार असेल, तर अडवू नका, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे सातारा मध्यवर्ती बस स्थानकातून सोमवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात एक खासगी शिवशाही स्वारगेटच्या दिशेने रवाना झाली. त्याचप्रमाणे, मंगळवारी सकाळी साडेसात वाजताही एक शिवशाही बस प्रवासी घेऊन स्वारगेटला गेली होती. या गाडीसोबत संबंधित कंपनीचा चालक व एसटीचा एक वाहक गेला होता. मंगळवारी सायंकाळी साडेेचारच्या सुमारास संबंधित शिवशाही प्रवासी घेऊन सातारा बस स्थानकात आली. तेव्हा प्रवासी उतरल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी संबंधित वाहक राजेंद्र पवार यांना ‘तू गाडी घेऊन का जातोस, प्रवाहाच्या विरुद्ध का चाललास,’ अशी विचारणा केली.
वाहक राजेंद्र पवार आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये हमरी-तुमरी झाली. यातूनच चिडून राजेंद्र पवार यांनी वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात पाठीमागून येऊन दगड घातला. यामध्ये चिकणे हे गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. या घटनेची माहिती मिळताच, सातारा शहर व शाहुपुरी पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणली.