लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: आतापर्यंत आपण घरातील सोने, संसारपयोगी साहित्य चोरीला गेल्याचं अनेकदा ऐकत आणि पाहतही आलो आहोत, पण घरच चोरीला गेल्याचं कधी कोणी ऐकलं आणि पाहिलंही नसेल, पण एका व्यक्तीने स्वत:चे राहते घर चक्क चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिलीय. यामुळे पोलिसांची डोकी भनानू लागलीत. आता हे घर पोलीस कसे शोधून देतायत? याकडे साऱ्या पाटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
पाटण तालुक्यातील विहे येथील अरविंद पाटील (वय ४०) हे अनेक वर्षांपासून मुंबई येथे नोकरीच्या निमित्ताने कुटुंबीयासमवेत स्थायिक झाले आहेत. कोयना नदीकाठी जुने विहेमध्ये त्यांचं माडीचं घर होतं. कालांतराने सोयी-सुविधेच्या दृष्टीने त्यांनी नवीन विहेमध्ये एक घर खरेदी केले. त्या घरामध्ये ते राहू लागले. पत्नी आणि ते स्वत: नोकरी करत असल्यामुळे गावी येणे -जाणे फारसे नसायचे. जुनं माडीचं घर थोडंफार मोडकळीस आलं होतं. त्यामुळे या घराकडं त्यांचं लक्षही नसायचं, पण एके दिवशी ते गावी आले. तेव्हा त्यांना चक्क जागेवर घरच नसल्याचे पाहायला मिळाले. घराची मोकळी जागा. तीही शेणाने सारवलेली. पत्र्याची पाच सहा पानं तिथं पडलेली त्यांना दिसली. ज्या घरात आपण खेळलो, बागडलो. जिथं आपण लहानाचं मोठं झालो, या साऱ्या आठवणी त्यांच्या डोळयासमोर तरळू लागल्या. ते अत्यंत अस्वस्थ झाले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी थेट पाटण पोलीस ठाणे गाठले. घर चोरीला गेल्याची त्यांची तक्रार ऐकून पोलीसही अवाक् झाले. अशाप्रकारची विचित्र तक्रार पहिल्यांदाच पोलिसांना ऐकायला मिळत होती.
सुरुवातीला पोलिसांनी म्हणे चालढकलच केली. अरविंद पाटील यांनी अर्जावर अर्ज करण्यास सुरुवात केली. गृहमंत्र्यांपासून पोलीस अधीक्षकांपर्यंत साऱ्यांनाच त्यांनी घर चोरीच्या तक्रारीचा अर्ज दिला. सरतेशेवटी पाटण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचा निर्णय घेतला. पोलीस तेथे पोहाेचल्यानंतर जागेवर गंजलेल्या पत्र्याशिवाय काहीच सापडले नाही. इथं घरं होतं, याचातरी पोलिसांनी पंचनाम्यात उल्लेख केला, पण एवढं मोठं घर चोरीला जातं. या घराचं माडी व माडीचं कपाट, तुळव्या, कडी पाटाच्या फळ्या, तीन चौकटी, घराच्या चारी बाजूच्या आतील व बाहेरील भिंत, दगड, माती, माढीवर चढण्यासाठीचा जीना, खिडक्या आदी साहित्यांचा उल्लेख मात्र पंचनाम्यात कुठेच झाला नसल्याचे अरविंद पाटील यांचे म्हणणे आहे. आता हे घर चोरीला जाऊन जवळपास दीड वर्षे उलटले, पण पोलीस तक्रार घेत नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
घर चोरून नेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. घर चोरून नेणाऱ्यांवर कारवाईसाठी त्यांनी जोमाने पाठपुरावा सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांना नुकतेच ते भेटले असून, बन्सल यांनीही संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.
चौकट : घरफळाही सातत्याने भरताहेत
अरविंद पाटील यांच्या घराची ग्रामपंचायतीमध्ये पश्चिममुखी दगड, विटा, माती बांधकाम वर पत्रा पडीक घर, उत्तर-दक्षिण १५ व पूर्व-पश्चिम २९ फूट अशी नोंद आहे. दरवर्षी ते या पडीक घराचा घरफळासुद्धा भरत होते. त्यांनी घरफळा भरलेल्याच्या पावत्याही तक्रार अर्जासोबत जोडल्या आहेत. असे असतानाही इथं घर होतं का नाही, असा प्रश्न पोलिसांकडून उपस्थित झाला आहे, असेही पाटील सांगता आहेत.
कोट :
अरविंद पाटील यांचा तक्रारअर्ज मिळाला आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना पुन्हा बोलविण्यात आले असून, चौकशीनंतर यातील वस्तुस्थिती समोर येईल.
निंगराज चौखंडे- सहायक पोलीस निरीक्षक, पाटण
फोटो : २३ दत्ता यादव
टीप : साताऱ्याला वापरली आहे...इतर आवृत्तींसाठी