सातारा : सातारा नगरपालिकेची सोमवार, दि. २६ रोजी आयोजित करण्यात आलेली स्थायी समितीची ऑनलाईन सभा कोरमअभावी रद्द करावी लागली. या सभेची ऑनलाईन लिंक मोबाईलवर देऊनही केवळ तीनच पदाधिकाऱ्यांनी या सभेला हजेरी लावली.
विविध विकासकामांना मंजुरी देण्यासाठी सातारा पालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. या सभेची नोटीस पदाधिकाऱ्यांना दि. १७ रोजी टपालाने पाठविण्यात आली होती. तसेच सभेच्या अजेंड्यावर १४३ विषय ठेवण्यात आले होते. नियोजन करुन ऑनलाईन सभेची लिंक पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आली होती.
सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष माधवी कदम यांनी सभेला प्रारंभ केला. दरम्यान, पाचच मिनिटात सभेला आरोग्य सभापती अनिता घोरपडे व नियोजन सभापती स्नेहा नलावडे यांनीच हजेरी लावली. त्यामुळे कोरम न भरल्याने स्थायी समितीची सभाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिन्याला एक सर्वसाधारण सभा होणे गरजेचे असताना सातारा पालिकेच्या गेल्या दीड वर्षात केवळ तीन सर्वसाधारण सभा झाल्या आहेत. याचा शहर व हद्दवाढीतील नियोजित विकासकामांवर परिणाम होऊ लागला आहे. आता स्थायीची सभादेखील कोरमअभावी रद्द करावी लागली आहे.
फोटो : सातारा पालिका