वाई :
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटामुळे सततचा लॉकडाऊन असल्यामुळे व्यावसायिक, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वाई तालुक्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आवाक्यात येण्यासाठी प्रशासनाने १५ एप्रिलपासून संपूर्ण वाई शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले.
येत्या १५ दिवसांत खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजाला खते व बी-बियाणांची अत्यंत गरज भासणार आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना कमी प्रमाणात खते, औषधे खरेदी करावी लागतात. काहींना दुकानदार उधारीवर देत असतात. तसेच व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार ठप्प असून, मुलांचे पुढील शैक्षणिक प्रवेश सुरू होणार असून, त्यांनाही समस्येला सामोरे जावे लागत आहे. कोरोना महामारी व लॉकडाऊन कधी थांबेल व संपेल, याची कोणालाही ठोसपणे शाश्वती देता येत नाही. त्यामुळे येथील बळीराजा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा वाई प्रशासनाने गांभीर्याने विचार करून कोरोनाच्या नियम अटींवर वाई तालुक्यातील कृषी सेवा केंद्र व मर्यादित उपस्थिती व मर्यादित वेळेत बँका सुरू करण्याची मागणी बळीराजासह व्यावसायिक, नागरिकांकडून केली जात आहे.
वाईच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त व लवकर सुरू होत असल्याने येथील शेतकरी धूळवाफेवर पेरणी करतो तसेच पश्चिम भागात भाताचे पीक हे प्रमुख पीक असल्याने पहिल्या पावसातच भाताचे बियाणे (तरवे) जमिनीच्याआड करावे लागतात. त्यासाठी त्याला खरीप हंगामाच्या पंधरा दिवस अगोदर खते व बी-बियाणे घरपोच करावे लागते. कडक लॉकडाऊनमुळे तालुक्यातील सर्व कृषीसेवा केंद्रे बंद असल्याने बळीराजाला खते व बी-बियाणे काहीही खरेदी करता आलेले नाही. याचीही शासनाने कुठे तरी दखल घेऊन कृषीसेवा केंद्र उघडून बळीराजाला खरीप हंगामाचा दिलासा द्यावा, अशी साद घातली जात आहे.
कोट..१
सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी नियम, अटींवर कृषी सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर वाई तालुक्यामधील कृषी सेवा केंद्रे सुरू करण्यात यावीत. वाईचा पश्चिम भाग दुर्गम असून आजच्या परिस्थितीमध्ये दळणवळणाची मोठी समस्या आहे.
-सयाजी पिसाळ
कोट..२
१५ एप्रिलपासून बँका बंद असल्यामुळे व्यावसायिक, नागरिक यांची अनेक कामे खोळंबली आहेत. बँका बंद, एटीएम मशीनही अनेकवेळा बंद असल्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. वाई शहरातील बँका कोरोनाच्या नियमांचे पालन करून मर्यादित कर्मचाऱ्यांवर चालू करून व्यावसायिकांना दिलासा द्यावा.
- दत्तात्रेय मोझर, व्यावसायिक, वाई