महाबळेश्वर : महाबळेश्वर, पाचगणी ही पर्यटनस्थळे कोरोनामुळे बंद असल्यामुळे तालुक्यातील पर्यटन व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील पर्यटनावर अवलंबून असलेल्या जनतेचे आर्थिक व मानसिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे.
प्रशासनाने मागील काही दिवसांत व्यवसाय काही प्रमाणात सुरू केला; पण थोड्याच दिवसांत कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू असणारा व्यवसाय पुन्हा बंद करण्यात आला. महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटन व्यवसायावर आधारित असलेले हॉटेलमालक त्यांचे कर्मचारी, छोटे-मोठे व्यवसाय असणारा व्यापारी, टॅक्सी टुरिस्ट व्यवसायांवर अवलंबून असलेला वर्ग, घोडे व्यावसायिक तसेच महाबळेश्वर तालुक्यातील आदी व्यावसायिकांची आर्थिक घडी संपूर्णतः विस्कळीत झाली असताना महाबळेश्वर तालुक्यातील सर्व रहिवाशांसाठी स्वतःच्या जिवा इतकेच आपल्या कुटुंबाला जगण्यासाठी पैसे कमविणे हे अत्यंत गरजेचे आहे. आधीच प्रशासनाचे सर्व प्रकारचे कर भरावे लागत आहेत. त्यामध्ये लाॅकडाऊनमुळे कोणत्याही प्रकारची सूट प्रशासनाकडून दिली गेली नाही. त्यामुळे वारंवार लॉकडाऊन लादत असताना प्रशासनाने सामान्य जनतेचा कोणताही विचार केला नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व व्यवसाय चालू झाले नाहीत तर तालुक्यातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रशासनाने महाबळेश्वर तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळे, व्यवसाय, व्यापार, टॅक्सी व्यवसाय, घोडे व्यवसाय व इतर व्यवसाय कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांना निवेदनाद्वारे दिला. यावेळी मनसेचे ओंकार पवार, राजेंद्र पवार, नितीन पार्टे आदी उपस्थित होते.