फलटण : फलटण शहर व तालुक्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी शहरातील कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडे सर्व पक्षीय नेतेमंडळींनी निवेदनाद्वारे केली आहे.
फलटण शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून, रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले आहे. त्यासाठी फलटण शहरालगत बंद स्थितीत असलेल्या झिरपवाडी येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करावे, तसेच फलटण नगर परिषद मालकीचे सांस्कृतिक भवन विस्तारित इमारतीमध्ये गतवर्षी वाढत्या कोरोना रुग्ण संख्येचा विचार करून कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र गतवर्षी त्याची गरज भासली नसल्याने ते अपूर्णावस्थेत राहिले. आता त्याची गरज लक्षात घेऊन ते तत्काळ सुरू करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असून, ते इंजेक्शन मिळणे अवघड झाले आहे. ऑक्सिजन सिलिंडर, रक्ताचा साठाही फलटणमध्ये कमी प्रमाणात असून, फलटण शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना या महाभयंकर रोगाशी सामना करण्यासाठी झिरपवाडी (ता. फलटण) येथील बंदस्थितीत असलेले ग्रामीण रुग्णालय व शहरातील सांस्कृतिक भवन मागील बाजूस उभारण्यात आलेल्या इमारतीत कोरोना केअर सेंटर सुरू करावे तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन, रक्तसाठा, बेड किती शिल्लक आहेत, त्याची माहिती नागरिकांना होण्यासाठी एक हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब खराडे, फलटण तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमिरभाई शेख, शिवसेना फलटण शहरप्रमुख विजय मायणे, फलटण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, शिवसेना फलटण तालुकाप्रमुख प्रदीप झणझणे व विकास नाळे, सामाजिक कार्यकर्ते तात्याबा गायकवाड, युवक काँगेसचे अध्यक्ष प्रीतम जगदाळे, दलित पँथरचे शहराध्यक्ष मंगेश आवळे आदींसह मान्यवर मंडळी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
(प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना निवेदन देताना अमिरभाई शेख, काकासाहेब खराडे आदी.)