कऱ्हाड : ऑनलाईन शिक्षण प्रणाली चांगली असल्याचे शिक्षण विभागही सांगत असतो. मात्र, अजूनही परीक्षा का झाल्या नाहीत. असा सवाल पंचायत समिती सदस्यांनी केला. त्यावर ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी शबनम मुजावर यांनी दिली. यावर ऑनलाईन असो वा ऑफलाईन, तत्काळ परीक्षा सुरू करा. कोरोना, ऑनलाईन, ऑफलाईनच्या गोंधळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नका अशी शिक्षण विभागाची कानउघाडणी सदस्यांनी केली.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी ३ रोजी मासिक सभा पार पडली. सभापती प्रणव ताटे अध्यक्षस्थानी होते. सभेदरम्यान, शिक्षण विभागाचा आढावा शबनम मुजावर यांनी सादर केला. यावेळी जिल्हा परिषद शाळांच्या रखडलेल्या परीक्षांबाबत विचारणा करताना सदस्यांनी शिक्षण विभागाची कानउघाडणी केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी-जास्त होत असल्याने शाळा काही काळ चालू-बंद ठेवाव्या लागत आहेत. परंतु, शाळा बंद असल्याच्या कालावधीत मुलांना शिक्षकांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण दिले. ही प्रक्रिया चांगली असल्याचेही मध्यंतरी शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. असे असताना अजूनही परीक्षा का घेण्यात आल्या नाहीत? याबाबतची विचारणा उपसभापती देशमुख यांनी केली. यावर ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मुजावर यांनी दिली. यावर, कोरोना, ऑनलाईन, ऑफलाईनच्या गोंधळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना काहीच येत नसल्याची परिस्थिती सांगत परीक्षा ऑनलाईन अथवा ऑफलाईन घ्या, परंतु, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नका, असेही देशमुख यांनी यावेळी सुनावले.
दरम्यान, शिक्षण विभागाच्या आढाव्यावेळी मुजावर म्हणाल्या, जिल्ह्यात सध्या १ ते १० मार्चपर्यंत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यामध्ये ऊसतोड, बांधकाम व अन्य शाळाबाह्य मुलांचा समावेश होत असून, त्यांचा सर्व्हे सुरू आहे. त्यासाठी नियुक्त २९ शिक्षक हजर झाले आहेत. तसेच जि. प. शाळेतील सहा शाळांची मॉडर्न स्कूलची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सध्या पाचवी ते १२ पर्यंतच्या शाळा असून, शिक्षकांच्या कोविड टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दररोज पाच शाळांना नियुक्त पथकांमार्फत भेटी दिल्या जात आहेत. तसेच शाळांच्या शिष्यवृत्ती परीक्षांसह इतर परीक्षाही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून, त्याची तयारी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
ग्रामपंचायत आढाव्यावेळी अधिकाऱ्यांनी तालुक्यात सरासरी ६५.८८ टक्के करवसुली झाल्याचे सांगितले. करवसुलीच्या मुद्यावरून सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. कालवडे ग्रामपंचायतीच्या करवसुलीवर बोट ठेवत चालू वर्षी १ रुपयाचीही वसुली झाली नसल्याचे गटातील सदस्यांनी नमूद केले. हा मुद्दा घेऊन संपूर्ण करवसुली प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करण्यात आली.
डॉ. लोखंडे यांनी तालुका आरोग्य विभागाचा आढावा सादर केला. ते म्हणाले, सध्या लसीकरणाचा दुसरा टप्पा चालू असून, लसीकरणाची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. यासाठी वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयात एकमेव केंद्र असून, त्या ठिकाणी ६० वर्षांवरील लोकांना मोफत लसीकरण करण्यात येत आहे. तसेच त्यासाठी प्रत्येकांनी सेल्फ रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असून, रजिस्ट्रेशन झालेल्यांनाच याठिकाणी लस देण्यात येईल. या केंद्रावर रजिस्ट्रेशननुसार लसीकरण होत असल्याने गर्दी होत आहे. त्यासाठी शासनाने येथील कृष्णा, सह्याद्री, एरम व कोळेकर हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरू केले असून, तत्काळ लस घेणाऱ्यांना त्या ठिकाणी २५० रुपये घेऊन लस घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.