दहिवडी : माण तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून वारुगड या गावाकडे पाहिले जाते. या भागाकडे येणारी एसटी अचानक बंद झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तब्बल १२ किलोमीटरची रोज पायपीट करावी लागत आहे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून, कॉलेजला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे दहिवडी आगाराचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वारुगड परिसरातील बारा वाड्या एकत्र येऊन वारुगड हे ठाण मांडले जाते. हे ठिकाण अतिशय डोंगराळ आहे. या भागातील अनेकजण परगावी जातात, तर विद्यार्थी कॉलेजला जातात. या गावाकडे येणारी गाडी बंद झाल्याने मुलांना पायपीट करावी लागते. याबाबत नागरिकांनी आगारात अनेक हेलपाटे मारून निवेदन देऊन कशीतरी गाडी सुरू केली. मात्र, ती ही आता बंद झाली आहे.
या भागात बारा वाड्यांसाठी दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षण घेण्यासाठी मलवडी व दहिवडी हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. या ठिकाणाहून अनेक मुले कॉलेजला येतात. आता बारावीच्या परीक्षा आहेत. दहावी परीक्षा मलवडीत होणार आहेत. यामुळे अचानक गाडी बंद झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेची मोठी गैरसोय होणार आहे. दहिवडीचे आगारप्रमुख जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असून, स्वत:च्या गावातील दोन विद्यार्थांसाठी गाडी सोडता, मग आम्हाला वेगळा न्याय का, असा सवालही गणेश शिंदे यांनी केला आहे.
गोडी सोडण्याबाबत अनेकवेळा निवेदन देऊनही दहिवडी आगार अचानक गाड्या बंद करून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. यासंदर्भात दिलीप कदम, गणेश शिंदे, तानाजी क्षीरसागर, नरहरी यादव, नवनाथ शिंदे, शिवाजी खांडे, मामा गोसावी, दुर्योधन बोडरे यांनी संबंधित खात्याला निवेदन दिले आहे.ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारादहिवडी-गरडाचीवाडी ही गाडी दोन दिवसांत पूर्ववत सुरू न झाल्यास समस्त १२ गावचे नागरिक आंदोलन करणार आहोत. यासंदर्भात अनेकवेळा निवेदन देऊनही दहिवडी आगार गलथान कारभार करीत असेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा माजी चेअरमन व सदस्य दिलीप कदम यांनी दिला आहे.