पाटण : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पाटण व बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलनाला शनिवारी दमदार सुरुवात झाली. ग्रंथदिंडी व शोभायात्रेने या संमेलनास प्रारंभ झाला. ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक दर्शन घडवत अन् साहित्य वाचनाच्या नव्या जाणिवांची पेरणी करत शनिवारी पाटण येथे निघालेल्या विभागीय साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे सकाळी ९ वाजता सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. डॉ. प्रज्ञा पवार, डॉ. सोपानराव चव्हाण, आमदार उल्हास पवार, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. एस. डी. पवार, रवींद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.बाळासाहेब देसाई कॉलेजचे एनसीसीचे विद्यार्थी, सुलोचनाबाई पाटणकर कन्याशाळा, माने देशमुख विद्यालय, दादासाहेब पाटणकर हायस्कूल, नागोजीराव पाटणकर विद्यामंदिर पाटण, जिल्हा परिषद शाळा पाटण मुले, जिल्हा परिषद शाळा रामपूर मुले मुली, पाटण इंग्लीश स्कूल, फुलराणी बाल मंदिर, लिटील एन्जल्स, बाल संस्कार बालक मंदिर, पाटणकर प्राथमिक विद्यामंदिर या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी झांजपथक, पारंपरिक वेशभूषा, लेझीम पथक, विविध विषयांवरील चित्ररथासह दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीची सुरुवात पाटण ग्रामपंचायत येथून झाली. त्यानंतर झेंडा चौक, लायब्ररी चौक, राजवाडा, सिद्धार्थनगर मार्गे दिंडी कार्यक्रमस्थळी दाखल झाली. (प्रतिनिधी)
ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनास प्रारंभ
By admin | Published: October 09, 2016 12:16 AM