महाबळेश्वर : महाबळेश्वरमधील बाजारपेठ अनेक दिवसांपासून बंद असल्याने व्यापारी कर्जबाजारी होत आहेत. या विळख्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी निर्बंध शिथील करावेत, अशी मागणी महाबळेश्वर येथील उपनगराध्यक्ष अफजल सुतार व माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही महिन्यांचा उपवाद वगळता महाबळेश्वर व पाचगणी ही जुळी पर्यटनस्थळे कोरोनामुळे बंद आहेत. अलीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केली आहेत. एकीकडे पर्यटनासाठी महाबळेश्वर खुले करण्यात आले आहे. परंतु, बाजारपेठ बंद आहे. यामुळे सर्वसामान्य व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. व्यवसाय बंद असल्याने कर्जबाजारी झालेला व्यापारी आता या कर्जाच्या विळख्यात अधिकच गुंतत चालला आहे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी बाजारपेठ सुरू होणे आवश्यक आहे. पर्यटनावर येथील सर्वच घटकांचा चरितार्थ अवलंबून आहे, म्हणून आता लवकरात लवकर बाजारपेठ सुरू करण्याची मागणी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे सुरू करावीत. येथील लाॅज व हाॅटेल व्यवसाय सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच आहेत परंतु सर्वसाधारण गरजेची परंतु जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकानेही सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत. बाजारपेठेप्रमाणेच येथील टॅक्सी व्यवसाय, घोडे व्यवसाय सुरू करण्याची आवश्यकता आहे.
या शिष्टमंडळात ॲड. संजय जंगम, अतुल सलागरे, विशाल तोष्णीवाल, तौफिक पटवेकर, सचिन वागदरे, रवींद्र कुंभारदरे व टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अंकुश बावळेकर यांचा समावेश होता.