लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खंबाटकी घाटातील दुसऱ्या वळणावरील धोकादायक चढ काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या घाटातील वळणावरील धोका टळल्याने वाहन चालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.घाटाच्या सहापदरीकरणात या वळणावर रस्ता रुंदावला गेला. मात्र, येथील वळण तांत्रिकदृष्ट्या चुकीचे बनले गेल्याने अपघात घडत होते. याबाबत ‘लोकमत’ने यापूर्वी वृत्त प्रसिद्ध करून हायवे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर वस्तुस्थिती लक्षात घेऊन या ठिकाणी उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. खंबाटकीचा मुख्य घाट चढताना दुसऱ्या वळणावर उभ्या चढणीसह तीव्र वळण घेण्यात आले होते. वास्तविक या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करताना ‘बँकिंग आॅफ रोड’ बिघडला होता. रस्ता बनवताना तांत्रिकदृष्ट्या राहिलेल्या या चुकीमुळे वाहने वळताना अचानक पलटी होत होती. त्यामुळे या वळणावर सातत्याने अपघात होत होते. लाखो रुपये खर्चून बनवलेल्या या रस्त्यावरील त्रुटींमुळे वाहनांचे नाहक नुकसान होत होते. घाटासारख्या मुख्य रस्त्यावर केलेले दुर्लक्ष ‘लोकमत’ने उजेडात आणले होते.खंबाटकी घाटाच्या सहापदरीकरणाच्या कामात अनेक ठिकाणी त्रुटी राहिलेल्या आहेत. त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. दुसऱ्या वळणावरील धोकादायक चढण व जागोजागी संरक्षक कठड्यांची दुरवस्था याबाबत वारंवार दुरुस्तीची मागणीही केली जात होती. अखेर हायवे प्रशासनाला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त सापडला असून, वळणावरील चढण कमी करण्यासाठी रस्ता खोदला आहे. या जागी चढण कमी करून योग्य वळण देण्याची उपाययोजना सुरू केली आहे. खर्च कोणाच्या माथी...रस्ता बनविण्यासाठी लाखो रुपये खर्ची पडल्यानंतर केवळ तांत्रिक मुद्द्यांवर भर दिला गेला नसल्याने पुन्हा काम करण्याची वेळ वर्षभरातच ओढवली आहे. त्यामुळे या अतिरिक्त खर्चाचा बोजा कोणाच्या माथी पडणार अशीही चर्चा जनतेमध्ये केली जात आहे.
धोकादायक चढ काढण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 11:16 PM