परळी : ‘सातारा तालुक्यातील परळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परळी पंचक्रोशीतील जे कोरोना रुग्ण आढळतील त्यांना गृहविलगीकरण न करता स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार परळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काडसिद्धेश्वर मठ परळी येथे विलगीकरण कक्ष सुरू करणार आहे,’ अशी माहिती प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली.
यावेळी सरपंच बाळासाहेब जाधव, मंडलाधिकारी शिवाजी मोहिते, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऊर्मिला बनगर, उपसरपंच नंदकुमार धोत्रे, रोशनी काठाळे, अशोक काठाळे, गजानन बोबडे, उमा दळवी, आरती परळे, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी मुल्ला यांनी परळी प्राथमिक आरोग्य केंद्र, छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील लसीकरण केंद्राची पाहणी केली. परळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नित्रळ, रोहोट, धावली, करंजे तर्फ परळी अशी उपकेंद्र येतात. मात्र, या ठिकाणी विलगीकरण कक्षासाठी जागा पाहाव्यात. परळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच जे कोरोनाबाधित रुग्ण आहेत, अशा रुग्णांना विलगीकरण करण्यासाठी श्री काडसिद्धेश्वर मठ येथे प्रशस्त जागा, स्वतंत्र स्वच्छतागृह असल्याने ही जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी शाळा, हायस्कूल आहेत त्या ठिकाणीदेखील विलगीकरण कक्षाची उभारणी करावी.
यावेळी मिनाज मुल्ला यांनी उपस्थित अधिकारी यांना कोरोनाबाबतच्या जबाबदारीची वाटणी करीत सूचना केल्या.
(चौकट)
हे तर आपले आद्यकर्तव्य!
विलगीकरण कक्षासाठी प्रांताधिकाऱ्यांनी कण्हेरीचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांना थेट फोन लावून आम्हाला तुमचा मठ हवाय, अशी मागणी करताच मठामध्ये विलगीकरण कक्ष सुरू कराच, आणखी काय मदत हवी आहे, अशी विचारणा स्वामी यांनी केली आहे व मठामध्ये विलगीकरणास संमती मिळाली.
२९परळी
परळी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील लसीकरण केंद्राची प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी पाहणी केली. (छाया : अक्षक सोनटक्के)