दहिवडी : माण तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाई आहे. आतापर्यंत १४ ग्रामपंचायतींनी टॅंकरसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. अन्यथा संबंधित अधिकाऱ्याला रस्त्यावर उतरुन जाब विचारण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात भाेसले यांनी म्हटले आहे की, कोरोनाची महामारी सुरू आहे. सर्वच ठिकाणी संचारबंदी असताना काही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. माण तालुक्यात अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. पाण्यासाठी लोकांना पायपीट करूनही हंडाभर पाणी मिळत नाही. आतापर्यंत १४ ग्रामपंचायतींनी पाण्याचे टॅंकर सुरू करण्यासाठी प्रस्तावदेखील सादर केले आहेत. परंतु, माणचे महसूल अधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याचे सरपंच बोलून दाखवत आहेत.
पाण्याची टंचाई आणि कोरोनामुळे घरामधून बाहेर निघण्यास मज्जाव, या दुहेरी संकटात जनता सापडली आहे. असे असताना अधिकाऱ्यांकडून कामात कुचराई होत आहे. अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लागलीच पाठपुरावा करण्याची गरज आहे.