महाबळेश्वर : कोविडच्या संकटामुळे गेली वर्षभरापेक्षाही जास्त काळापासून महाबळेश्वरचा पर्यटन व्यवसाय पूर्णतः बंद आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांवरच महाबळेश्वरच्या जनतेची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. परंतु पर्यटन बंद असल्याने महाबळेश्वरच्या जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे व्यवहार पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी केली.
किरण शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाबळेश्वर तालुक्यामध्ये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली आहे. या परिस्थितीचा विचार करता येथील नागरिकांच्या जीविताचे रक्षण व्हावे म्हणून येथील पर्यटन व्यवसाय चालू होणे अतिशय आवश्यक आहे. महाबळेश्वरमध्ये आठशे टॅक्सी व्यावसायिक आहेत तर १४० घोडा व्यावसायिक आहेत. त्यांच्या माध्यमातून दरवर्षी शासनास व नगर पालिकेस महसूल प्राप्त होतो. शेकडोवर गाईड व कॅन्व्हासर्स आहेत. हॉटेलमध्ये शेकडो कामगार आहेत. हे सर्वजण केवळ आणि केवळ पर्यटनावर अवलंबून आहेत. सर्व घटक हे महाबळेश्वरचा पर्यटन व्यवसाय बंद असल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शासनाने राज्यात रिक्षावाले व काही घटकांना आर्थिक मदत दिली आहे. त्याच धर्तीवर महाबळेश्वरच्या टॅक्सीवाले, घोडावाले, पथारीवाले, हॉकर्स व हॉटेल कामगार यांना दर महिना पाच हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. त्यांना मोफत व सुरळीत रेशन पुरवठा करावा तसेच महाबळेश्वरचा पर्यटन व्यवसाय तत्काळ चालू करावा, अशी मागणी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक किरण शिंदे यांनी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्याकडे केली.
याप्रसंगी फारुखभाई वारुणकर, शफीक महापुळे उपस्थित होते.