विद्यार्थ्यांची बरबादी टाळण्यासाठी लसीकरण सुरू करा विश्वंभर बाबर
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसवड : ‘कोरोनामुळे शाळा बंद आहेत. साहजिकच विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे मोठे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी युवा पिढीऐवजी शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण अग्रक्रमाने सुरू करावे,’ अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.
कोरोनाने विविध क्षेत्रांचे प्रचंड नुकसान केले आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कटली आहे. त्यापेक्षाही भयानक नुकसान शैक्षणिक क्षेत्राचे झालेले आहे. दहावी, बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच लहान गट व पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. कोरोनामुळे मुलगा कोणत्या वर्गात आहे याचा विसर पालकांना पडलेला आहे. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांचा शैक्षणिक पाया कच्चा राहिला तर त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आयुष्यभर तोट्याचा राहणार आहे. ती पिढी कायमची बरबादीच्या वाटेवर राहणार आहे. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुटी असेल तर त्यांना अभ्यासक्रमाचा विसर पडतो. कोरोनामुळे तर दीड वर्षात ही पिढी संपूर्ण शैक्षणिक विश्वच विसरून गेलेली आहे. या प्रकारामुळे केवळ कुटुंबाचाच नव्हे तर देशाचा शैक्षणिक पाया कमकुवत होण्याची भीती आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणाली सर्वसामान्यांसाठी म्हणावी तेवढी सोयीची नाही. ही वस्तुस्थिती आहे. इंटरनेटचा अभाव तसेच मोबाइल व इतर सोयीसुविधांचा अभाव यामुळे सर्वसामान्य घटक शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ऑफलाइन शिक्षण ही काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अग्रक्रमाने लसीकरण करून ऑफलाइन शिक्षण म्हणजेच शाळा प्रत्यक्षात लवकरात लवकर सुरू करणे विद्यार्थ्यांसाठी फलदायी ठरणार आहे,’ असा विश्वासही प्रा. विश्वंभर बाबर यांनी व्यक्त केला आहे.