म्हसवड : महाराष्ट्राचे कुलदैवत, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेस गुढीपाडव्याच्या दिवशी विधिवत पद्धतीने शंभू महादेवाची गुढी उभारुन प्रारंभ झाला.
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवीन संवत्सर प्रारंभ होत असल्याने यादिवशी शंभू महादेवाची विधिवत पद्धतीने पूजा करून सालकरी सेवाधारी मंडळी व देवस्थान समिती मार्फत मंदिरात गुढी उभारली. तसेच स्थानिक सुवासिनींच्या उपस्थितीत घाना भरून शिव-पार्वती हळदी समारंभासाठी लागणारी हळद दळण्याचा पारंपरिक सोहळा पार पडला. परिसरातील स्थानिक कावडीनी जलाभिषेक करून शंभू महादेवाचे दर्शन घेतले.
शिंगणापूर यात्रेस १० एप्रिल रोजी हळदी समारंभाने प्रारंभ होणार आहे. १३ एप्रिल रोजी चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी ध्वज बांधण्याचा सोहळा तसेच शिव-पार्वती विवाहसोहळा होणार आहे. सोमवार, दि. १५ रोजी एकादशीच्या दिवशी काळगावडे राजे दर्शनासाठी येणार आहेत. मंगळार, दि. १६ रोजी द्वादशीच्या दिवशी मुंगीघाटातील कावडी सोहळ्याने यात्रेची सांगता होणार आहे.
यात्रेसाठी हॉटेल, मेवामीठाई, नारळप्रसाद, स्टेशनरी दुकाने तसेच मनोरंजन साधने यात्रा परिसरात दाखल होत आहेत. भाविकांना सोयीसुविधा देण्यासाठी प्रशासन यंत्रणा, ग्रामपंचायत व देवस्थान समिती सज्ज झाली आहे.