सातारा : कोरोनात केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची तसेच सर्वसामान्य जनतेची अवस्था दयनीय झालेली आहे. आता तीन आठवडे लागू करण्याचा निर्णय होणार असल्याची चर्चा आहे. राज्य शासनाने कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये, अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम होतील, अशी भीती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, लोकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केले आहेत. अनेक लोकांचे हातावर पोट आहे. तीन आठवडे लाॅकडाऊन केले तर या लोकांचे जगणे मुश्कील होऊन जाईल. त्यामुळे तीन आठवड्यांच्या लोकडाऊनमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. राज्य शासनाने तडकाफडकी निर्णय घेऊ नये, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
राज्य शासनाने तयारी करायला हवी होती, याबाबत सांगताना ते म्हणाले, मधल्या काळात पेशंट कमी झाले त्यावर दुसरी लाट येऊ शकते हे लक्षात घेऊन राज्य शासनाने तशी तयारी करायला हवी होती. रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडची उपायोजना, हॉस्पिटलची तयारी, आदी गोष्टींवर राज्य शासनाने भर द्यायला हवा होता; पण ते मधल्या काळात झालेले नाही. त्यामुळे ऐनवेळी आता दुसऱ्यांदा कोरोनाचा सामना करताना अवघड जात आहे. तरीही लोकांची गैरसोय लक्षात घेऊन आम्ही राज्य आणि केंद्र शासनाच्या पातळीवर बोलणी करून रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, सिलिंडर, हॉस्पिटलमधील बेडची व्यवस्था, आदींबाबत लक्ष ठेवून आहोत.
संभाजी भिडे यांनी सांगली येथे केलेल्या वक्तव्याबाबत देखील शिवेंद्रसिंहराजे यांनी नाराजी व्यक्त केली. उद्याच्या कालावधीमध्ये परिस्थिती काय आणि आपण बोलतोय काय याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कोरोना हा कोणाला होऊ शकतो, शूर व्यक्तीला होतो, इतर कुणाला होत नाही, आज असं बोलणं चुकीचं आहे.