वाई : वाई येथे माजी आमदार मदन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी भाजपाच्या वतीने वीजवितरण कंपनीला पथदिव्यांचे थकीत बिल ग्रामपंचायतीकडून न घेता राज्य सरकारकडून घेण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले.
वाई भाजपाच्या वतीने व विविध ग्रामपंचायतीच्या वतीने वाई येथे वीजवितरण कंपनीच्या अभियंता तसेच प्रांताधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आले. १५ व्या वित्त आयोगाच्या पैशातून गावातील आरोग्य, पाणीपुरवठा, गटारे आदी कामांसाठी खर्च करते. आता त्यातून पथदिव्यांची बिल भरण्यासाठी तरतूद ग्रामपंचायतीने करावी, असे सांगण्यात आले. यामुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांना खीळ बसणार आहे. म्हणूनच शासनाने फेरविचार करावा आणि ती स्वतः किंवा जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत भरण्यात यावी, जर शासनाने लवकर तोडगा काढला नाही तर सर्व ग्रामपंचायती व भाजपाच्या वतीने मोठं आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन देताना यशराज भोसले, सचिन घाटगे, गजानन भोसले, तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, चंद्रकांत शेलार, यशवंत लेले, सागर जाधव, मयूर गाढवे,
युवराज कोंढाळकर, विक्रम शिंदे, ज्ञानेश्वर कायंगुडे, प्रशांत जाधव, दीपक जाधव यांसह अनेक भाजपचे कार्यकर्ते व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.