वाई : येथील जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई व रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, पाचवड या दोन्ही महाविद्यालयांतील शारीरिक शिक्षण विभाग व अंतर्गत मूल्यमापन हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘‘कोरोना-१९’बाबत जाणीव, जागृती व लसीकरण’ या विषयावर दि. २८ व २९ मे रोजी दोनदिवसीय राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारचे सर्व नियोजन लेफ्टनंट समीर पवार, प्रा. स्मिता कुंभार, डॉ. शिवाजी कांबळे व डॉ. राजेंद्र देशमुख यांनी केले आहे.
या विषयांतर्गत शुक्रवार, दि. २८ मे रोजी वाई येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शंतनू अभ्यंकर हे ‘कोरोना लसीकरण’ या विषयावर तर शनिवार, दि. २९ मे रोजी कऱ्हाड येथील हृदयतज्ज्ञ व इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट डॉ. अभिजीत शेळके ‘निरोगी हृदय’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या वेबिनारचे उद्घाटन जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंतराव चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. वाई व पाचवड पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव व प्राचार्य डॉ. प्रदीप शिंदे यांनी केले आहे.