रशिद शेख
औंध : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेले राज्यव्यापी ऊस तोडबंद आंदोलन खटाव तालुक्यात चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दर जाहीर केल्याशिवाय उसाच्या कांडक्याला हात लावून देणार नाही अशी ठाम भूमिका स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे ऊस आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.एकरकमी एफआरपी, मागील शिल्लक व अन्य मागण्यासाठी सुरु केलेल्या ऊस तोडबंद आंदोलनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळीपासून खटाव तालुक्याच्या प्रत्येक भागात फिरून ऊस वाहतूक रोखली आहे. तर पुसेसावळी येथील गट ऑफिसला टाळे ठोकले, त्यानंतर निमसोड, कळंबी येथे सुरु असलेली ऊस तोड थांबविली. तालुक्यातील वर्धन, ग्रीन पॉवर, पडळ कारखान्यावर धडक भेटी देऊन नवीन ऊस वाहतूक आली आहे का याची माहिती घेतली.शुक्रवारी सकाळी पळशी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला रोखले असून अजूनही कारखान्यांना जाग येत नसेल तर हे आंदोलन बेमुदत सुरु राहील, दर जाहीर करा, कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका अशी प्रतिक्रिया खटाव तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे यांनी दिली.