कुडाळ : ‘लहान वयात अनेक मुले तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी जात असून, त्यांना वेळीच याच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली पाहिजे. निरोगी आणि आनंदी जीवनाचा कानमंत्र देऊन व्यसनाधीनेतेपासून दूर ठेवण्याचा शालेयस्तरापासून प्रयत्न झाला पाहिजे,’ असे मत तंबाखूमुक्त शाळा अभियानाचे जावळी तालुका समन्वयक नितीन जाधव यांनी व्यक्त केले.
आपटी येथील प्राथमिक शाळा व आपटी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यसनाधीनता आणि कर्करोग या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास विलास बागल, गेमसिंग वसावे, रवींद्र पवार, संतोष कदम व हरिचंद्र कांबळे उपस्थित होते. अनिल जाधव यांनी मुलांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. यावेळी गावातून जनजागृतीसाठी ‘तंबाखू मतलब... खल्लास, आमची शाळा तंबाखूमुक्त शाळा, तंबाखू-गुटखा खाऊ नका, रोगाला निमंत्रण देऊ नका, आदी घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली.
जाधव म्हणाले, ‘कर्करोग हा जीवन संपवणारा घातक आजार आहे. याचे विविध प्रकार असून, कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत. यापैकी व्यसनाधीनता, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन ही प्रमुख आहेत. यापासून परावृत्त असले पाहिजे. व्यसनमुक्त आरोग्यदायी जीवनाचे फायदे आहेत. याकरिता सर्वांनी व्यसनाधीनता टाळावी आणि निरोगी रहावे.’
मुख्याध्यापिका अहिल्या निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. आनंद जाधव यांनी आभार मानले.