सातारा : वाळवंट सफरीचा आनंद घ्यायचाय आणि तोही साताºयात. तर चला आपल्या खासगी मालकीची गाडी घेऊन शाहूपुरी रस्त्याकडे. झक्कास माती आणि धम्माल खड्डे यांतून प्रवास करताना तुम्ही आनंद घ्याल वाळवंटातील उंट सफरीचा आणि तोही चक्क साताºयात राहून...! सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पोस्ट सध्या नेटीझन्सबरोबर शाहूपुरीवासियांच्या भावना व्यक्त करत आहे.
सातारा शहराला लागून असलेल्या शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीतील हे रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. नागरिकांबरोबरच विरोधकांनी तीव्र आंदोलन करूनही या रस्त्याबाबत कायमचा तोडगा निघत नसल्याचा अनुभव येथील स्थानिकांनी घेतला आहे. त्यामुळे शाहूपुरीचे रस्ते आता सोशल मीडियावर झळकू लागले आहेत. हे रस्ते सोशल मीडियावर पोहोचविण्यात तरुणाई आघाडीवर आहे; पण त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनानेही लक्ष देणे आवश्यक बनले आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत शाहूपुरी रस्त्यावरून ये-जा करणाºया लोकांना येथील मोठ्या आणि खोल खड्ड्यांमुळे किरकोळ अपघाताचे प्रसंग अनुभवले होते. शाहूपुरी विकास आघाडीच्या वतीने या पार्श्वभूमीवर आंदोलनही केले होते; पण यापैकी कोणत्याही गोष्टींना न जुमानता ग्रामपंचायतीने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शाहूपुरीवासियांकडून केला जात आहे.
बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या माहेरवाशिणींना अवघडलेल्या अवस्थेत या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळे शाहूपुरी चौकातून गेंडामाळ रस्त्याला निघून तिथून बुधवार नाकामार्गे त्यांना सातारा शहरात येण्याची वेळ केवळ या रस्त्यामुळे आल्याचे येथील स्थानिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पाठीवर दप्तर घेऊन जाणाºया विद्यार्थ्यांना गाडीच्या चाकाखाली आलेल्या दगडामुळे दुखापत झाल्याचे प्रकारही येथे घडले आहेत. त्यामुळे रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. सोशल मीडियावरही या रस्त्याच्या आणि होणाºया त्रासाची चर्चा होती.डांबर गुल्ल... रस्त्यावर फक्त धूळ !सातारा शहरातून शाहूपुरीकडे जाणाºया रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साठून राहिल्याने पावसाळ्यात याचा अंदाज येत नव्हता. पाऊस संपल्यानंतर आता हे खड्डे उघडे पडले आहेत. या रस्त्यावर नियमित वाहतुकीची मोठी वर्दळ असल्यामुळे रस्त्यावरील डांबर पूर्णत: गुल्ल झाले आहे आणि त्याजागेवर छोटे दगड आणि मातीची निव्वळ धूळ बघायला मिळत आहे.वाहनांच्या वर्दळीमुळे उडणाºया धुळीमुळे परिसरातील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त झाली आहेत.
१५ डिसेंबरनंतर या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होईल. शासकीय पातळीवर काम करताना काही बाबी सांभाळाव्या लागतात. नवीन अंदाजपत्रकात या रस्त्याचे काम समाविष्ट केल्याने भविष्यात ग्रामस्थांना त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.- अमृता प्रभाळे, सरपंच, शाहूपुरी
जुना मेढा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असला तरीही येथून प्रवास करणारे हे शाहूपुरीवासीय आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही या रस्त्यासाठी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.- भारत भोसले, ग्रामपंचायत सदस्य