उंब्रज : कऱ्हाड तालुक्यातील गोडवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतातून गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो या पिकाची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. गोडवाडी रस्त्यालगत असणाऱ्या दीपक जाधव यांच्या शेतातून चोरट्यांनी एकाचवेळी सुमारे पन्नासहून अधिक कॅरेट टोमॅटो चोरून नेले. यामुळे ४५ हजारांवर नुकसान झाले आहे.
सध्या बाजारात टोमॅटोला दर चांगला असल्याने चोरटे शिवारात घुसून चक्क टोमॅटोवर डल्ला मारत असल्याने शेतकऱ्यांसमोर हा नवीनच प्रश्न निर्माण झाला आहे.
गोडवाडी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो या पिकाचे उत्पादन घेत असतात. शेतीत उत्पादित पिकाला दर मिळेल की नाही हे शेतकऱ्यांच्या हातात नसते. परंतु दर मिळाला नाही, तरी पुढीलवेळी दर मिळेल, या आशेवर पुढील पीक शेतकरी घेत असतो. आता पिकाला चांगला दर मिळत असताना, या ठिकाणी चोरट्यांनी या पिकावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळविली आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या पिकावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांना ताबडतोब पकडावे, अशी मागणी होत आहे. पोलिसांनीही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली सर्व यंत्रणा राबविणे गरजेचे बनले आहे.
शेतात रात्रगस्त सुरू
गोडवाडी रस्त्यालगत असणाऱ्या दुधालकी नावाच्या शिवारात दीपक जाधव यांचे टोमॅटो पिकाचे शेत आहे. त्यांनी अडीच एकरात टोमॅटोची लागण केली आहे. सध्या पीक तोडणीस आले असल्यामुळे टोमॅटोचा तोडा सुरू करण्यात आला आहे.
तत्पूर्वीच पंधरा दिवसांत वारंवार त्यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची चोरी होत आहे. त्यासाठी त्यांनी शेतावर रात्रगस्तही सुरू केली आहे. चोरटे पाळत ठेवून टोमॅटोवर डल्ला मारत आहेत. बुधवारी शेतकरी घरी परतल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी सुमारे पन्नास कॅरेट असा सुमारे पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या टोमॅटो चोरला आहे.
चोरट्यांनीच राबविली यंत्रणा
शेतात टोमॅटो तोडणे, ते कॅरेटमध्ये भरणे, तेथून रस्त्यावर काढणे, वाहनात भरणे व नेणे ही यंत्रणा राबविणे एकाचे काम नसते. त्यामुळे चोरट्यांनी स्वतःची स्वतंत्र यंत्रणाच उभी केली असल्याची शक्यता आहे. या यंत्रणेची पोलिसांनी पाळेमुळे खोदून काढणे गरजेचे आहे. चोरट्यांनी रातोरात टोमॅटो तोडून लंपास केल्याने चोरट्यांची टोमॅटो चोरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच उभी केल्याचे दिसून येत आहे.