सातारा : सातारा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी मंगळवारी मतदान झाले. यामध्ये सभापतिपदी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटातील मिलिंद कदम तर उपसभापतिपदाची माळ जितेंद्र सावंत यांच्या गळ्यात पडली. निवडी झाल्यानंतर पंचायत समिती कार्यालय परिसरात गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सातारा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जोरदार रस्सीखेच सुरू झाली होती. यासाठी मंगळवारी सकाळी अकरा वाजता पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी प्रक्रिया सुरू केली. यामध्ये सभापतिपदासाठी राष्ट्रवादीतर्फे खेड गणातून मिलिंद कदम यांनी दोन अर्ज दाखल केले. तर शेंद्रे गणातून राष्ट्रवादीच्या छाया कुंभार यांनी एक तर सातारा विकास आघाडीतून दरे खुर्द गणातील हणमंत गुरव यांनी अर्ज दाखल केले. तर उपसभापतिपदासाठी लिंब गणातून जितेंद्र सावंत यांनी राष्ट्रवादीतून दोन अर्ज दाखल केले. तर सातारा विकास आघाडीचे कोडोली गणातील रामदास साळुंखे यांनी अर्ज भरला. पुढील प्रक्रियेला दुपारी दोन वाजता पुन्हा सुरुवात झाली. यामध्ये अर्ज मागे घेण्याच्या वेळेत सभापतिपदासाठी दाखल केलेल्या छाया कुंभार यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणूक रिंगणात प्रत्येकी दोन अर्ज राहिल्याने मतदान घ्यावे लागले. पंचायत समितीच्या सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. यामध्ये सभापतिपदासाठी आमदार गटाचे मिलिंद कदम यांना अकरा तर खासदार गटाचे हणमंत गुरव यांना नऊ मते पडली. त्याचप्रमाणे उपसभापतिपदासाठी आमदार गटाचे जितेंद्र सावंत यांना अकरा आणि खासदार गटातील रामदास साळुंखे यांना नऊ मते पडली. त्यानंतर कदम आणि सावंत यांना विजयी घोषित केले. (प्रतिनिधी)निकालापूर्वीच गुलालाची उधळणसातारा पंचायत समितीत राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाचे अकरा तर सातारा विकास आघाडीचे नऊ सदस्य असे संख्याबळ आहे. त्यामुळे दोन्ही पदे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला मिळणार, हे निश्चित मानले जात होते. हाच आत्मविश्वास कार्यकर्त्यांनाही होता. त्यामुळे मतदान होण्यापूर्वी पंचायत समितीच्या बाहेर कार्यकर्त्यांचा विजयोत्सव साजरा होत होता. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. आमदारांकडून स्वागतनिवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पंचायत समितीच्या सभागृहात आले. त्यांनी नूतन सभापती मिलिंद कदम व उपसभापती जितेंद्र सावंत यांचे स्वागत केले. यावेळी प्रांताधिकारी स्वाती देशमुख व गटविकास अधिकारी सचिन घाडगे उपस्थित होते.
सातारा पंचायत समितीच्या सभापतिपदी कदम
By admin | Published: March 14, 2017 10:48 PM