कऱ्हाड : तस्करीसाठी बिबट्याचे कातडे व नख्या घेऊन आलेल्या एकास वन विभागाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून कातडे आणि चार नख्या हस्तगत करण्यात आल्या. कळंबे, ता. पाटण येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली असून, वन विभाग त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहे.
जोतिराम तुकाराम कदम (वय ५२, रा. जांभेकरवाडी, ता. पाटण) असे याप्रकरणी अटकेत असलेल्याचे नाव आहे. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील तारळे विभागात असणाऱ्या कळंबे गावामध्ये एकजण बिबट्याचे कातडे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती अधिकाºयांना मिळाली. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी वनअधिकारी व कर्मचाºयांनी सापळा रचला.
ज्याठिकाणी ही तस्करी होणार होती, त्या परिसरात अधिकारी दबा धरून बसले. संशयित जोतिराम कदम त्याठिकाणी त्यांना दिसला. त्याच्याकडे एक पिशवी होती. अधिकाºयांना संशय आल्यामुळे त्यांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पिशवीत बिबट्याचे कातडे आणि चार नख्या आढळून आल्या. अधिकाºयांनी जोतिराम कदम याला अटक केली. तसेच दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची वन कोठडी सुनावली. त्यानंतर अधिकारी, कर्मचाºयांनी आरोपीकडे कसून चौकशी केली.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी जोतिराम कदम हा पुणे येथील शिवाजीनगर भागात असलेल्या वाकडेवाडी परिसरात दुचाकी शोरूमची साफसफाई करण्यासाठी एका ठेकेदारामार्फत गेला होता. शोरूमची सफाई करताना तेथून काही वापरायोग्य साहित्य त्याला मिळाले. ते साहित्य शोरूमच्या मालकाची परवानगी घेऊन त्याने आपल्या घरी आणले. घरी आणल्यानंतर साहित्य तपासत असताना त्याला एक पिशवी आढळली. त्या पिशवीत त्याला बिबट्याचे कातडे तसेच नख्या मिळाल्या. त्यानंतर जोतिराम कदमने याबाबतची माहिती वन विभागाला देणे गरजेचे होते. मात्र, त्याने तसे न करता कातडे विकून पैसे कमावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कातडे विक्री करण्याचा त्याने प्रयत्न केला. सुरुवातीला कातडे व नख्या विक्रीसाठी त्याने अरुण भाणसे नामक मच्छिमाराकडे दिल्या. सुमारे पंधरा दिवस कातडे त्या मच्छिमाराकडे होते. मात्र, त्याच्याकडून त्याची विक्री झाली नाही. त्यामुळे जोतिराम कदम हा संबंधित मच्छिमाराकडे जाऊन पुन्हा ते कातडे व नख्या घेऊन आला होता.पाच वर्षांपूर्वी शिकारसंशयिताकडे आढळून आलेल्या कातडे व नख्यांची वन विभागाच्या अधिकाºयांनी प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली आहे. संबंधित कातडे आणि नख्या सुमारे पाच वर्षांपूर्वीच्या असल्याचा अंदाज त्याद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित बिबट्याची पाच वर्षांपूर्वी कोणी व कुठे शिकार केली, याचा छडा लावण्याचे आव्हान वन अधिकाºयांसमोर आहे. तसेच बिबट्याच्या इतर अवशेषांचे काय झाले, याचाही तपास होणे गरजेचे आहे.