शिवथर : परिसरामध्ये देशी दारू विक्री व मटका तेजीत चालू आहे. गेली कित्येक दिवसांपूर्वी महिलांनी दारूबाबत उठाव केला होता. थोडे दिवस हा अवैध धंदा बंद होता; परंतु पुन्हा हा व्यवसाय तेजीत चालू झाला आहे. याबाबत सर्व महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.शिवथर परिसरामध्ये मटका आणि देशी दारूचा व्यवसाय करणारे कोणालाही भीड घालत नाहीत. त्यांचाच मनमानी कारभार करत अरेरावीने व्यवसाय करत आहेत. जर याला तालुका पोलिसच खतपाणी घालत असतील तर सर्वसामान्य जनता काय करणार? असाही सवाल उपस्थित होत आहे. बऱ्याचदा सातारा तालुक्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवैद्य धंद्यावर छापा टाकला; परंतु त्यांना यश आले नाही. छापा टाकण्याअगोदरच खबऱ्यामार्फत अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांना माहिती मिळत असल्याने छापा टाकल्यावर ‘मी नाही त्यातली’ अशी परिस्थिती निर्माण होत आहे.वारंवार निवेदन देऊनदेखील याबाबत ठोस निर्णय लागत नसल्याने महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या परिसरातील अवैद्य धंदे बंद न पडल्यास आम्ही सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहोत, अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे. (वार्ताहर)वारंवार सांगून व निवेदन देऊन आम्हाला न्याय मिळत नाही. तात्पुरत्या स्वरूपामध्ये व्यवसाय बंद होतो आणि पुन्हा सुरू होतो, याला जबाबदार कोण?- शकुंतला साबळे, माजी सरपंच, शिवथर
मटका, दारूविक्री तेजीत
By admin | Published: November 18, 2014 8:58 PM