सातारा: एखाद्याच्या घरात मिरची तळली, तर आजूबाजूच्या परिसरातील लोकांना ठसका लागतो. इथे तर मिरचीच्या गोडावूनलाच आग लागली. यामुळे या मिरचीच्या धुराचा अख्या शाहूपुरीत ठसका लागला. तब्बल दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतरच अनेकांचा ठसका थांबला. या आगीत संबंधित मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोरच व्यावसायिक आर. एम. बागवान यांचे मिरचीचे गोदाम आहे. या गोदामाला रविवारी सकाळी अचानक आग लागली. बघता-बघता आगीने राैद्ररूप धारण करून गोदामात असलेली दोन ट्रक मिरची जळून खाक झाली. या मिरचीच्या ठसक्याने शाहूपुरीकर अक्षरश: बेजार झाले. या आगीची माहिती अग्निशामक दलाला मिळाल्यानंतर दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामकच्या जवानांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. या आगीत बागवान यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.
फोटो : जावेद खान