वाई : वाई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या धर्मपुरी घाटावर हरिहरेश्वर व शनी देवाच्या मंदिर परिसरात कचरा कुंडीशेजारी एका व्यक्तीने बेजबाबदारपणे भला मोठा औषधाचा साठा टाकल्याने परिसरातील नागरिक व भटक्या प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ यामध्ये विविध प्रकारच्या औषधांच्या गोळ्या, इंजेक्शन तसेच विविध प्रकारच्या औषधांच्या बाटल्यांचा समावेश आहे. ही औषधे बेवारस टाकली आहेत. जाणकारांच्या मते यामध्ये झोपेच्या गोळ्या तसेच विविध प्रकारच्या मुदत संपलेल्या गोळ्या असण्याची शक्यता आहे़ दरम्यान, धर्मपुरी घाट परिसरात औषधे बेवारस टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. धर्मपुरी घाट वाई शहराच्या मध्यवर्ती किसन वीर चौकापासून जवळ आहे़ या परिसरात विविध प्रसिद्ध मंदिरे आहेत. यामध्ये हरिहरेश्वर, नाग मंदिर व शनी देवाचे मंदिर आहे़ एक मंगल कार्यालय, लहान मुलांची शाळा असल्याने या परिसरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्याने अशा प्रकारे बेफिकीरपणे औषधे टाकणे ही विकृत मनोवृत्तीचे द्योतक आहे़ या परिसरात लहान मुलांचा वावर जास्त असल्याने ही एक गंभीर ठरणारी बाब आहे़ तसेच या परिसरात फिरणाऱ्या प्राण्यांच्या आरोग्यसही धोका निर्माण होऊ शकतो़ वाई शहरातील जागृत नागरिकांनी कृष्णा नदी स्वच्छ होण्यासाठी मोठे अभियान राबविले; परंतु शिक्षित लोकांची ही विकृत मानसिकता अशा घटनातून समोर येत आहे़ तरी संबंधित नागरिकांनी आपली मानसिकता बदलल्याशिवाय असे घृणास्पद कृत्य बंद होणार नाहीत. आता संबंधित विभागाने दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. सध्या औषधे टाकल्यामुळे नागरिकांच्यात संतापाची लाट उसळली आहे़ संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी) संबंधितांवर कारवाई करणार.... वाई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बेजबाबदारपणे लोकांच्या व प्राण्यांच्या आरोग्यास धोकादायक ठरणारा वैद्यकीय कचरा टाकणे चुकीचे आहे. अशा प्रकारामुळे चुकीची घटना घडू शकते. यापुढे अशा घटना होणार नाहीत. यासाठी सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे. शहरात असा औषधांचा साठा बेवारस टाकणाऱ्या संबंधितांवर त्वरित कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध विभागाच्या वतीने सांगण्यात आले. वाईतील मंदिर व शाळा परिसरात अशा प्रकारचा वैद्यकीय कचरा हा आरोग्य व पर्यावरणास धोकादायक आहे. संबंधित विभागाने दोषींचा शोध घेऊन कडक कारवाई करावी. - विश्वास सोनावणे, मनसे शहराध्यक्ष
धर्मपुरी घाटावर कालबाह्य औषधांचा साठा
By admin | Published: July 11, 2016 1:01 AM