लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने आरोग्य विभागाने कोरोना लसीचा वेगही वाढवला आहे. त्यामुळे दिवसाला जवळपास आठ हजार डोसची गरज भासत आहे. असे असताना आता केवळ दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक आहे. तिसऱ्या दिवशी जर डोस उपलब्ध झाले नाहीत, तर ही लसीकरण मोहीम कशी सुरू ठेवायची, या चिंतेत आरोग्य विभाग आहे.
कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाने सर्वांत जास्त भर दिला आहे तो म्हणजे लसीकरणावर. जितक्या वेगाने लसीकरण होईल तितके रुग्ण कमी होतील अशी अटकळ आरोग्य विभागाकडून बांधण्यात येत आहे. गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत १ लाख ५९ हजार १३७ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. सुरुवातीला जिल्ह्यासाठी २५ हजार डोस उपलब्ध झाले होते. त्यानंतर लसीकरणाला जसा प्रतिसाद मिळत गेला तसतशी मागणीही आरोग्य विभागाकडून वारंवार करण्यात आली. आता तर ४५ वर्षांच्या पुढील व्यक्तींनाही लस देण्यात येत आहे. त्यामुळे लोकांकडून लस घेण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला साधारण आठ हजार डोस लागत आहेत. सध्याचा लसीचा साठा १३ हजार ९४९ इतका आहे. हा साठा केवळ दोन दिवस पुरेल एवढाच आहे. त्यातील पहिला दिवस मंगळवारी पूर्ण झाला आहे. आता केवळ बुधवारी एका दिवसापुरती लस आरोग्य विभागाकडे शिल्लक आहे. मागणी केलेली लस बुधवारी सायंकाळपर्यंत आली नाही तर गुरुवारी जिल्ह्यात लसीकरण कसे सुरू ठेवायचे, असा प्रश्नही आरोग्य विभागाला पडला आहे.
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग पाहता आरोग्य विभागाने पाच लाख डोसची गरज असल्याची मागणी केली आहे; परंतु या मागणीनुसार सातारा जिल्ह्याला डोस उपलब्ध होत नाहीत, अशी खंतही काही अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे लस कमी पडत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.