सातारा : चोरीस गेलेले सोने परत मिळेल की नाही, याची आशा सोडून दिलेल्या तक्रारदारांना पोलिसांनी गुरुवारी सुखद धक्का दिला. जिल्ह्यातून ७० तक्रारदारांना एकाच ठिकाणी बोलावून त्यांना सन्मानपूर्वक त्यांचे दागिने पोलिसांनी परत केले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या हस्ते हे दागिने तक्रारदारांना देण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२२ पासून नागरिकांचे चोरीस गेलेले ४४२ तोळ्यांचे दागिने (४ किलो ४२० ग्रॅम) हस्तगत केले. या दागिन्यांची किंमत तब्बल २ कोटी ७० लाख ८० हजार ७०० रुपये इतकी आहे. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, इतर चोरी प्रकरणांत एकदा दागिने चोरीस गेल्यानंतर हतबल होऊन अनेकजण दागिने परत मिळण्याची आशा सोडून देतात. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने वर्षभरात १६३ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले. यातील ७० तक्रारदारांना पोलिसांनी गुरुवारी दुपारी सातारा तालुका पोलिस ठाण्यातील शिवतेज हाॅल येथे बोलविले.
या ठिकाणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या हस्ते तक्रारदारांना त्यांचे दागिने परत करण्यात आले. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर उर्वरित काही तक्रारदारांचे दागिने परत केले जाणार आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोन्या-चांदीचे दागिने तक्रारदारांना परत मिळाल्याने समाधान व्यक्त केले. तसेच सातारा जिल्हा पोलिस दलाच्या कामकाजाचे त्यांनी काैतुकही केले. पोलिस उपअधीक्षक गृह अतुल सबनीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित यादव आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
तक्रारदार भारावले...
पोलिसांनी चोरीस गेलेले सोने परत दिल्याने अनेक तक्रारदार अक्षरश: भारावून गेले. पोलिसांचे कितीही आभार मानले तरी अपुरेच पडेल, अशा शब्दांत काहींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.