नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : सातारा शहरातील दोन ठिकाणच्या बंगल्यात चोऱ्या करुन दागिने विक्रीसाठी घेऊन आलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने दागिन्यासह पकडले. संबंधितांकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. नीलेश शरद तावरे (रा. घुले काॅलनी, शाहूनगर सातारा) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना चोरीचे गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली आहे. त्यानुसार देवकर यांनी पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले होते. दि. २७ जुलै रोजी निरीक्षक देवकर यांनाच काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन (एमएच,११. बीएम, १८२८) वरुन आणि काळ्या रंगाचे जर्किंग घातलेला एकजण साताऱ्यातील गोडोलीत चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. त्यावेळी संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकला. नीलेश तावरे असे त्याने नाव सांगितले. त्याची झडती घेतल्यावर प्लास्टिकच्या पिशवीत मणिमंगळसूत्र आणि अंगठी तसेच दोन मोबाईल मिळून आले. अधिक विचारपूस केल्यानंतर त्याने साताऱ्यातील देशमुख काॅलनी आणि तामजाईनगरमधील बंगल्यात चोरी केल्याचे सांगितले. याप्रकरणी सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे.
या कारवाईत पोलिस निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लैलेश फडतरे, मंगेश माडिक, प्रवीण फडतरे, हसन तडवी, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, मनोज जाधव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, सचिन ससाणे, पृश्वीराज जाधव, रोहित निकम, संकेत निकम आदींनी सहभाग घेतला.