नागठाणे : पुणे येथील शोरूममधील चोरीस गेलेल्या चार दुचाकी गाड्या बोरगाव पोलिसांनी जप्त करून चोरीचा पर्दाफाश केला आहे. नितीन दिनकर सुतार (वय ३५, रा. नागठाणे ता. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील नागठाणे-सासपडे रस्त्यावर बुधवार, (दि. ३) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलीस हवालदार मनोहर सुर्वे, पोलीस नाईक किरण निकम आणि राजू शिखरे हे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सासपडे चौकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करत होते.
त्यावेळी एक व्यक्ती विनानंबर प्लेटची दुचाकी घेऊन जाताना आढळला. दुचाकी चोरीची असल्याचा संशय आल्याने त्याचा शिताफीने पाठलाग करून त्याचे ताब्यातील गाडीचे नंबर प्लेट आणि कागदपत्रांबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता संबंधीत गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्याबद्दल आणखी तपास केला असता वाकडेवाडी पुणे येथील शेलार यामाहा शोरूममधील तीन दुचाकी व एक मोपेड अशा मिळून चार दुचाकी किंमत जप्त केल्या. त्यांची किमत ४ लाख ५२ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या गाड्यांबाबत पुणे शहर येथील खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यानंतर त्याला खडकी पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याकडील पुढील तपासात चोरीच्या आणखी गाड्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल तसेच सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम आणि राजू शिखरे यांनी केली.