सातारा/पेट्री : सातारा शहराला रविवारी दुपारी दीडच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपले. यामुळे नागरिकांची पळापळ झाली. तसेच रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. दरम्यान, सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात रस्त्याच्या बाजूलाच काही ठिकाणी दरड कोसळली.
सातारा शहरात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी बारानंतर आकाशात काळे ढग जमा होऊ लागले. त्यामुळे पाऊस हजेरी लावणार अशी चिन्हे दिसू लागली. त्यानंतर दीडच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास १५ मिनिटे पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. भाजी मंडईतील विक्रेत्यांच्या मालांत पाणी घुसले. यामुळे नुकसानही झाले. शहरातील रस्त्यावरून तसेच गटारे पाण्याने भरून वाहत होती.
सातारा शहराच्या पश्चिमेकडील यवतेश्वर भागातही रविवारी दुपारी पावसाने तासभर दमदार हजेरी लावली. तसेच कास तलाव परिसरातही रिमझिम स्वरुपात पाऊस पडत होता. यवतेश्वर घाटातही रस्त्यावरून पाणी वाहत होते. याचदरम्यान पावसामुळे यवतेश्वर घाटात दरड कोसळली. यामुळे छोटे-मोठे दगड, माती रस्त्यावर आली. त्यामुळे चालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागली. या घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. अद्याप मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात झाली नसलीतरी घाटात दगड कोसळण्याच्या घटनांना प्रारंभ झाला आहे.