सातारा : ‘जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण, मृदसंधारण यांची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व कळण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ ही चळवळ जोरदारपणे राबवून टप्प्याटप्प्याने जिल्हा ठिबक सिंचनमय करावा,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग जिल्हा परिषद सातारा व कृषी विभाग राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी सभागृह येथे कृषी सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. सुदाम आडसूळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे, कृषी विकास अधिकारी दिगंबर बागल आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘दिवंगत वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीची सुरुवात करून महाराष्ट्रामध्ये ४ कृषी विद्यापीठांची स्थापना केली. या विद्यापीठांमधून कृषीविषयक संशोधनाला चालना देण्यात आली. राज्यामध्ये सिंचन क्षेत्रामध्ये ८० टक्के कोरडवाहू भाग आहे. उसासारख्या पिकाला पाटाने पाणी देऊन खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अतिरिक्त पाण्यामुळे जमिनी क्षारपड बनत आहेत. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची संवर्धन करणे सध्या महत्त्वाचे झाले आहे. दिवगंत नाईक यांच्या हरितक्रांतीचा आदर्श घेऊन दुसऱ्या हरितक्रांतीची सुरुवात नैसर्गिक साधनसंपत्ती टिकविण्याच्या माध्यमातून आणि शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन करणे काळाची गरज आहे. सातारा जिल्ह्यामधील २१५ गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची, भूमिसंधारणाची कामे झाली आहेत. या अभियानातून केवळ पाणी उपलब्ध करून देणे हे पुरेसे नाही. त्याचा वापर योग्य पद्धतीने करणे आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत कळणे हे महत्त्वाचे आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे. ‘ज्याच्याकडे वावर त्याच्याकडे पॉवर,’ या म्हणीचा मी वेगळ्या पद्धतीने वापर करू इच्छितो ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ ही चळवळ नियोजनबद्ध कार्यक्रमाने जिल्ह्यात उभी केल्यास जिल्ह्यातील शेती टप्प्याटप्प्याने शंभर टक्के ठिबक सिंचनमय होईल.’यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कृषी विकास अधिकारी दिगंबर बागल यांनी प्रास्ताविक केले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)दि. ६ रोजी शेतकऱ्यांचा मेळावा...‘सेंद्रिय शेती संदर्भाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे, या हेतूने दि. ६ जुलै रोजी सेंद्रिय शेतकऱ्यांचा मेळावा या कृषी सप्ताहअंतर्गत घेण्यात येणार आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि नैसर्गिक साधनसंपत्ती टिकविण्यासाठी ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही,’ असे संचालक डॉ. आडसूळ म्हणाले. दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतीमध्ये मोठे योगदान दिले. त्यांनी दिलेल्या संदेशानुसार कृषीमध्ये बदल होणे आवश्यक आहे. राज्याची शेती ऊर्जितावस्थेला नेण्यासाठी त्यांची ध्येय धोरणे होती. हरित क्रांतीबरोबरच त्यांनी धवल क्रांतीची घोषणा केली होती. कृषी सप्ताहाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांत जागृती करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान दिले पाहिजे.
माउलींच्या स्वागतावेळी कार्यकर्त्यांना रोखा
By admin | Published: July 02, 2015 10:37 PM